Nandurbar News : शिव उद्यान धाममध्ये साकारणार २१ फुटांची महादेवाची मूर्ती

वैभव करवंदकर 
नंदुरबार : शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या बाजूतील मोकळ्या मैदानात शिव उद्यान धाम  बनविण्यात येणार असून, या ठिकाणी २१ फुटांची काळ्या पाषाणाची महादेवाचे भव्य मूर्ती साकारण्यात येणार आहे. अशी माहिती शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली. येत्या ७ ते ८ महिन्यात शिव उद्यान धामाचे काम पूर्णत्वास येईल असेही त्यांनी सांगितले.
नंदुरबार शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन माजी आ.रघुवंशी यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी करण्यात आले त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी होत्या.यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, पालिकेच्या माध्यमातून शिव उद्यान धाम साकारण्यात येत आहे.या कामाची निविदा प्रक्रिया येत्या दोन-चार दिवसात पूर्ण होऊन लगेचच कामाला सुरुवात होईल.
नगरपरिषदेच्या माध्यमातून व परिसरातील रहिवाशांच्या लोकवर्गणीतून शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांच्या मागणीनुसार, ५१ शिव मंदिरे बांधण्यात आली असून आता देखील ३३ मंदिरे बांधण्यात येणार आहेत.
 सभागृह,ओपन जिमचे उद्घाटन
शहरातील मदन मोहन नगरात सभा मंडप, राजेंद्र पार्क, अवधूत पार्क व धर्मराज नगरात ओपन जिमचे उद्घाटन शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्षा रत्ना  रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,माजी नगरसेवक रवींद्र पवार, राकेश हासानी, प्रमोद शेवाळे,अतुल पाटील,जगन्नाथ माळी,मोहितसिंग राजपूत व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.