मुंबई : संभाजीनगरसह मालवणीमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या अनुचित प्रकारावर अनेक राजकीय नेते आपली मतं व्यक्त करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील या दोन्ही घटनांप्रकरणी आपलं मत व्यक्त करत, चिंता व्यक्त केली होती. शरद पवारांच्या या घटनेप्रकरणावरील प्रतिक्रियेला भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
अलीकडच्या काळात संभाजीनगर आणि मुंबईतील मालवणीमध्ये काही प्रकार घडले. या दोन्ही ठिकाणच्या घटनेला धार्मिक स्वरूप आहे की काय? अशी चिंता वाटायला लागली आहे.’ शरद पवारांनी हे वक्तव्य करून सरकारच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
नारायण राणे काय म्हणाले?
या विधानावर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं. ‘शरद पवार यांनी चिंता व्यक्त करू नये. त्यांना अभिप्रेत असलेले राज्य आणि कारभार लवकरच दिसेल.’, असे नारायण राणे यांनी सांगितले.
यण राणे यांनी पुढे सांगितलं की, ‘बोलताना संयम असावा. कुणाचीही मनं दुखतील असं बोलायला नको असं मला वाटतं. शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. पण सरकार त्यांचं राहिलेलं नाही. त्यांचं सरकार असताना लोकांना जास्त चिंतेत टाकलं होतं.’
‘यांच्या सरकारच्या काळात लोकं चिंताग्रस्त होते. कारण राज्याला मुख्यमंत्रीच नव्हता. तुम्ही म्हणाले उद्धव ठाकरे कोण होते? तर ते फक्त मातोश्रीचे मुख्यमंत्री होते.’, अशी टीका नारायण राणे यांनी केली. त्याचसोबत, ‘शरद पवार यांना अभिप्रेत असं राज्य आणि कारभार लवकरच दिसेल.’, असे मत व्यक्त करत नारायण राणे यांनी पवरांना प्रत्युत्तर दिलं आहे.