नरेंद्र मोदींच्या एका निर्णयामुळे अमेरिकेतील दुकानांमध्ये प्रचंड गर्दी; हे आहे कारण

नवी दिल्ली : देश पातळीवर घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमुळे देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम दिसून येतात. असाच काहीसा प्रकार भारत आणि अमेरिकेत दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतासाठी एक निर्णय घेत देशवासियांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला मात्र त्या निर्णयामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

तांदळाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने जगातील अनेक देशांमध्ये तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या दरातही वाढ होणार आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेतील लोक तांदूळ खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटबाहेर प्रचंड गर्दी करत आहेत. तांदूळ खरेदीसाठी रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.

भारत हा तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. भारत अनेक देशांना गैर बासमती तांदूळ निर्यात करतो. या निर्णयाचा परिणाम अमेरिकेसह इतर देशांमध्येही दिसून येत आहे. अमेरिकेशिवाय नेपाळ, फिलिपिन्स आणि कॅमेरून या देशांचाही यामध्ये समावेश आहे. एका अहवालानुसार, तांदूळ हे जगातील निम्म्या लोकसंख्येचे मुख्य अन्न मानले जाते. आता निर्यात न झाल्यास या देशांमध्ये तांदळाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.