हिराबेन पंचत्वात विलीन; अंत्यसंस्कारानंतर नरेंद्र मोदी पुन्हा देशसेवेत रुजू

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे आज निधन झाले. हीराबेन यांना अहमदाबाद येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारावेळी त्यांचे निधन झाले. मोदी यांनी गांधीनगरमध्ये हीराबेन यांच्या पार्थिवाला खांदा दिला. यानंतर स्मशानभूमीत मुखाग्नी देत अंत्यसंस्कार केले. १८ जून रोजी हीराबेन यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केले होते.

गुरुवारी मध्यरात्री अचानक हीराबेन मोदी यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान हीराबने यांची प्राणज्योत मालवली. हीराबेन यांच्या निधनावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. हीराबेन मोदी यांच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पतरुंड असा मोठा परिवार आहे.

अंत्यसंस्कारानंतर मोदी पुन्हा देशसेवेत रुजू

मोदींना आईच्या निधनाचे वृत्त समजताच ते पहाटेच अहमदाबादला रवाना झाले. आईच्या पार्थिवाला खांदा देत मुखाग्नीही दिला. यानंतर मोदींनी कुटुंबासमवेत काही वेळ घालवत लगेचच दैनंदिन कामांना सुरुवात केली. हीराबेन यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मोदी पुन्हा देशसेवेत रुजू झाले आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये होणार्‍या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी व्हर्च्युअली सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय गंगा परिषदेच्या बैठकीशिवाय मोठे प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. मोदी राजभवनाकडे रवाना झाले आहेत.