‘मेड इन इंडिया’ विमानाबद्दल नरेंद्र मोदी म्हणाले…

कर्नाटक : कर्नाटकातील शिवमोग्गा विमानतळाचे सोमवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी जनतेला संबोधित केले. शिवमोग्गा विमानतळाचे कौतुक करताना मोदी म्हणाले की, शिवमोग्गा विमानतळ भव्य आणि अतिशय सुंदर आहे. कर्नाटकची परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा मिलाफ या विमानतळावर पाहायला मिळतो. हे केवळ विमानतळ नाही, तर या भागातील तरुणांच्या स्वप्नांच्या नव्या प्रवासाची मोहीम आहे. यावेळी मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

मोदी म्हणाले की, हा अमृतकल विकसित भारत बनवण्याचा काळ आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ही संधी चालून आली आहे. आज जगभरात भारताचा आवाज घुमत आहे. आपल्या सर्वांना सोबतच पुढे जायचे आहे. कर्नाटकवासीयांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्याला एकत्र यावे लागेल. भाजप सरकार हे गरीब आणि शेतकर्‍यांचे सरकार आहे. भाजप सरकार गरिबांच्या कल्याणासाठी काम करणारे सरकार आहे. हे माता-भगिनींचा स्वाभिमान, माता-भगिनींना संधी आणि माता-भगिनींचे सक्षमीकरण या मार्गावर चालणारे सरकार आहे.

एअर इंडिया काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार आणि तोट्यातील व्यवसायासाठी ओळखली जायची. आज एअर इंडिया नवीन उंची गाठत आहे. छोटी शहरेही एअर कनेक्टिव्हिटीने जोडली जावीत, असा विचार काँग्रेसच्या मनात कधीच आला नव्हता, अशी टीकाही पीएम मोदींनी केली. आज देशात डबल इंजिन सरकारमुळे अनेक मोठे प्रकल्प पूर्ण होत आहेत. तो दिवस दूर नाही, जेव्हा भारतातील नागरिक मेड इन इंडिया विमानात प्रवास करतील.