नवी दिल्ली : भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत दिल्लीत पार पडली. जवळपास ६ तास चाललेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांचा राजकीय आढावा घेतला. यावेळी एका महत्वपूर्ण विषयावर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. भाजपा प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन पुढे जात नाही अशी धारणा तयार होतेय ती दूर करायला हवी यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना बैठकीत जोर दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, प्रादेशिक पक्षांमुळे भाजपा अस्वस्थ आहे असं बिल्कुल वाटायला नको. भाजपाचे लक्ष नेहमी प्रादेशिक विकासाकडे केंद्रीत राहायला हवे. परंतु प्रादेशिक पक्षांसोबत भाजपा अस्वस्थ आहे अशी धारणा तयार व्हायला नको. ही स्थिती दूर करण्यासाठी पाऊले उचलायला हवीत. आम्हाला प्रादेशिक पक्षांच्या भावनांची जास्त काळजी आहे असं त्यांनी म्हटलं.
याच बैठकीत मोदींनी मुख्यमंत्र्यांना कानमंत्र दिला. लोकोपयोगी योजना आणताना खासदारांची मते जाणून घ्या, मुख्यमंत्री त्यांच्या आमदारांची अधिक काळजी घेतात असे दिसून येते. कारण आमदार मुख्यमंत्र्यांसाठी महत्त्वाचे आहेत. परंतु खासदारही तितकाच महत्त्वाचा आहे यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी पाहायला हवे. धोरणात्मक बाबींमध्ये खासदारांचाही समावेश करून घ्या अशा सूचनाही मोदींनी बैठकीत दिल्या आहेत. दरम्यान, एनडीए स्थापन होऊन २५ वर्ष पूर्ण होत आहेत अशावेळी मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करायला हवा. अधिक काळ कुठलीही आघाडी टिकत नाही. त्यामुळे पक्षाला अन्य सहकारी मित्र पक्षांसोबत हा आनंद साजरा करायला हवा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठकीत दिला.
या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे, पक्षाचे सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष आणि सरचिटणीस सुनील बन्सल उपस्थित होते. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हरियाणाचे मनोहर लाल खट्टर, आसामचे हिमंता बिस्वा सरमा, मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान आणि उत्तराखंडचे पुष्कर सिंह धामी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक हेही उपस्थित होते.