नवी दिल्ली : शिलाँग येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते, विरोधक ‘मर जा मोदी-मर जा मोदी’ म्हणत आहेत, पण जनता ‘मोदी तेरा कमल खिलेगा’, म्हणत आहे. पंतप्रधानांची ही भविष्यवाणी आता खरी ठरताना दिसत आहे. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या इशान्य भारतातील तिन्ही राज्यांमध्ये भाजापा सत्तेत वाटेकरी ठरणार आहे. एकेकाळी भाजप ईशान्येकडील राज्यांमध्ये सर्वात कमकुवत पक्ष समजला जात होता. मात्र यंदा तिन्ही राज्यांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे.
त्रिपुरामध्ये भाजप ३२ जागांवर आघाडीवर असून पुन्हा एकदा सरकार स्थापन करताना दिसत आहे. याशिवाय नागालँडमध्येही भाजप १२ जागांवर आघाडीवर आहे, यांपैकी २ जागा जिंकल्या आहेत. याच बरोबर मेघालयात सामना अडकला आहे. येथे एकूण ६० जागा आहेत. एनपीपी जवळपास २४ जागांवर आघाडीवर आहे, हा आकडा बहुमतापेक्षा बराच दूर आहे. अशा स्थितीत एनपीपी भाजपसोबत ५ जागा आणि इतर काही जागांसह सरकार स्थापन करू शकते.
यावेळी भाजपला त्रिपुरामध्ये ३९ टक्के मते मिळाली आहेत. नागालँडमध्येही १८ टक्के लोकांनी भाजपला पसंती दिली आहे. याशिवाय मेघालयातही ८ टक्के मते भाजपच्या खात्यात जात आहेत. भाजपसाठी त्रिपुराचा विजय हा सर्वात महत्त्वाचा असेल. २०१८ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजपला, यापूर्वी येथे तुरळकच यश मिळायचे. पण गेल्या ५ वर्षांपूर्वी भाजपने येथे पहिल्यांदाच सरकार स्थापन केले होते.