नागपूर : “स्वप्न पाहणे आणि ते पूर्णत्वास नेणे यात खूप मोठे अंतर असते. संकल्प पक्का असेल तो कधीतरी पूर्ण होतोच. तोच संकल्प जर सर्वांनी एकसंघ होऊन केला तर लवकर पूर्ण होतो. ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मनाच्या भावनेतून समाजाची आवश्यकता पूर्ण करणारा असा हा प्रकल्प आहे. संघ स्वयंसेवक या नात्याने देवेंद्र फडणवीसांनी केलेले हे कार्य अभिमानास्पद आहे. रा.स्व.संघ या प्रकल्पाच्या पाठीशी सदैव उभा आहे.”; असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
नागपूर येथे गुरुवार, दि. २७ एप्रिल रोजी ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’चा लोकार्पण सोहळा सरसंघचालकांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. सरसंघचालक पुढे म्हणाले की, ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला डॉ. आबाजी थत्ते यांचे नाव देण्यात आले आहे. आबाजींच्या वृत्तीचे संपूर्ण प्रतिबिंब या प्रकल्पातून उठून दिसते. त्यांच्या नावासोबतच त्यांच्या आपलेपणासुद्धा या प्रकल्पात जोडला गेला आहे.’ कॅन्सरबाबत संबोधताना ते म्हणतात, ‘कॅन्सर हा असा रोग आहे जो पहिले शरिराला नाही तर मनुष्याच्या हिम्मतीला नष्ट करतो. त्यामुळे कॅन्सर पीडित रुग्णांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांना सर्वात आधी आपलेपणा आणि हिम्मत देण्याची आवश्यकता असते. यासर्व गोष्टी सांभाळून इन्स्टिट्यूट आपले कार्य करत आहे.’
‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या उभारणीत संघभावनेची मोठी भूमिका आहे. याचा दाखला देत सरसंघचालक म्हणाले, ‘इन्स्टिट्यूट तयार होण्याच्या पहिल्या टप्प्यापासून सर्वजण संघभावनेने एकत्रितपणे कार्य करत आहेत. ज्यांना संघभावनेने काम करणे ठाऊक असते, तीच मंडळी पुढे सहकार्य करणाऱ्यांचा वर्ग तयार करू शकतात. याच वृत्तीतून हे इन्स्टिट्यूट उभे राहिले आहे.’ सरसंघचालकांनी दरम्यान समाजाला आवाहनही केले आहे. ‘आरोग्य आणि शिक्षणासाठी राज्य सरकार महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेच. मात्र त्यांच्यासोबत हा गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी समाजानेही एकत्र येण्याची आवश्यकता आहे. ज्या कॅन्सरग्रस्त रुग्णांची उपचार घेण्याची क्षमता नसेल, त्यांना निःशुल्क किंवा कमी खर्चात उपचार देण्यासाठी निधीची उपलब्धता याच समाजाच्या सहकार्यातून पूर्ण होईल. काही लोकांच्या एकत्रित येण्याने भव्य इन्स्टिट्यूट उभे राहत असेल तर संपूर्ण समाजाने एकत्र आल्याच काय चित्र उभे राहिल; याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.’