मुंबई : नाशिक येथे होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या ‘शेकरू’ या शुभंकराचे, बोधचिन्हाचे आणि बोधवाक्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, तसेच केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या दृकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थितीत शुक्रवार, दि. ५ जानेवारी रोजी करण्यात आले.
युवा महोत्सवासाठी महाराष्ट्राचा शेकरू हा राज्य प्राणी शुभंकर म्हणून निवडल्याबदद्ल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, महाराष्ट्राचा शेकरू हा दिमाखदार राज्याचं वैशिष्ट्ये सर्वासमोर पहिल्यांदाच अशा स्वरुपात येत आहे. शेकरू हा शांतता, मैत्री, गतीशीलता आणि पर्यावरण प्रेमाचं प्रतिक आहे. त्यातूनही युवकांना प्रेरणा मिळेल. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महोत्सवाच्या बोधचिन्हांचे आणि बोधवाक्य, घोषवाक्यांचेही अनावरण करण्यात आले. ‘युवा के लिए – युवा द्वारा हे बोधवाक्य आहे. तर महाराष्ट्रासाठी ‘सशक्त युवा- समर्थ भारत’ हे घोषवाक्य आहे. या महोत्सवाचे १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राला जी-२० नंतर पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी चालून आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हा राष्ट्रीय युवा महोत्सव यशस्वी करण्याची जबाबदारी महाराष्ट्राने घेतली आहे. आहे. त्यासाठी मोठ्या वेगाने तयारी सुरु आहे. यातून महाराष्ट्राची संस्कृती व कला परंपरा ही देशभर पोहचवता येणार आहे. सोळा वर्षांनंतर महाराष्ट्राला या युवा महोत्सवाच्या आय़ोजनाचं यजमानपद मिळाले आहे. यात जास्तीत युवक सहभागी होतील. हा महोत्सव उद्घाटनापासून ते समारोपर्यंत दिमाखदार होईल, असे नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.