Navapur : रासेयोच्या माध्यमातून देशाचा विकास करा : प्रा डॉ. एम. जे. रघुवंशी

Navapur :  राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तरुणांनी स्वतःचा सर्वांगीण विकास करावा.  सोबतच  दत्तक गावातही सामाजिक भान जोपासत जनजागृती करावी. तरुणांनी व्यसनांपासून लांब राहूण मोबाईलचा आवश्यकतेनुसारच वापर करावा. महाविद्यालयात वावरत असतानाही आपल्याकडून शिस्तभंग होणार नाही याची दक्षता घ्यावी असे प्रतिपादन गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य तथा क. ब. चौ. उमविचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ.एम. जे. रघुवंशी यांनी केले.

 

महाविद्यालयातील रासेयो एककाचे विशेष हिवाळी शिबिर मौजे केवडीपाडा येथे  झाले.  या शिबिराच्या समारोपाप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा रघुवंशी होते.  समारोपकर्ते म्हणून नंदुरबार तालुक्याचे तहसीलदार  नितीन गर्जे उपस्थित होते.  गर्जे यांनी स्वयंसेवकांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. या शिबिरादरम्यान रासेयो एककाने विविध सामाजिक उपक्रम राबविले. रक्तदान, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, आधार व आभार नोंदणी तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून जनजागृती घडवून आणली.

 

बालविवाह प्रतिबंध या विषयावर पथनाट्य सादर करून ग्रामस्थांमध्ये बालविवाह न करण्याची शपथही  त्यांनी ग्रामस्थांना दिली. गावातील नाले सफाई, ग्रामपंचायत व ग्रामदैवताच्या परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. शिवार भेटीच्या माध्यमातून केवडीपाडा परिसरातील शेतीची पाहणी करण्यात आली. 150 पेक्षा जास्त घरांचे सर्वे करून माहिती संकलित करण्यात आली.

 

या सोबतच शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी केवढीपाडा येथील आश्रम शाळेतील मुलांचे नख काढले व सुश्रुषा केली. याप्रसंगी नंदुरबार तालुका विधायक समितीचे सरचिटणीस  यशवंत देवराम पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना ग्रामीण संस्कृतीचे महत्त्व विशद केले.  संस्थेचे समन्वयक डॉ एम.  एस.  रघुवंशी, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.  डॉ . एन.  डी.  चौधरी, ग. तू. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा  सोमानी  व नंदुरबार तालुका विधायक समितीचे कार्यालय अध्यक्ष  पुष्पेंद्र रघुवंशी, विभागीय समन्वयक डॉ.  अमोल भुयार केवढी पाडा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.  बोराणे व श्री . गवळी आदी  उपस्थित होते.

 

निरोप समारंभाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ . दिनेश देवरे यांनी तर सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.  डॉ. उपेंद्र धगधगे यांनी केले. आभार महिला कार्यक्रम अधिकारी जयश्री नायका यांनी मानलेत.