मतदानादरम्यान CRPF टीमवर नक्षलवाद्यांचा हल्ला

धमतरी : छत्तीसगडमध्ये आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 70 जागांवर मतदान होत आहे. याच दरम्यान, धमतरी येथे सीआरपीएफच्या टीमवर नक्षलवादी हल्ला झाला आहे. गस्तीवर असलेल्या सीआरपीएफ आणि डीआरजी पथकांवर नक्षलवाद्यांनी एकामागून एक आयईडी स्फोट केले. यामध्ये बाईकवर असलेले दोन सीआरपीएफ जवान थोडक्यात बचावले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर बस्तरमध्ये अनेक ठिकाणाहून निवडणूक बहिष्काराचे आवाहन करणारे नक्षलवादी बॅनर आणि पॅम्प्लेट सापडले आहेत.

मतदान केंद्राला सुरक्षा देण्यासाठी सुरक्षा दलाचे पथक आले होते. घटनास्थळी दोन आयईडी असल्याची पुष्टी झाली आहे. सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्यासाठी नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला होता. कालच नक्षलवाद्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे बॅनर आणि पोस्टर्स लावले होते. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून नक्षलग्रस्त भागात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

राज्यातील मतदान केंद्रांपैकी 109 अतिसंवेदनशील तर 1670 संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. निष्पक्ष आणि शांततेत मतदानासाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राज्यात एकूण 90 हजार 272 मतदान कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यातील 20 जागांसाठी 7 नोव्हेंबरला मतदान झाले होते. निवडणुकीचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर होतील.