गोंदिया : महाराष्ट्रातील गोंदियाला लागून असलेल्या छत्तीसगढच्या राजनांदगाव सीमेवर पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद आणि एक जण जखमी झाला आहे. गोंदिया, महाराष्ट्र सीमेवर असलेल्या चेक पोस्टवर ड्युटीवेळी अचानक जंगलातून आलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला.
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. तर एक जण जखमी झाला आहे. यातील जवानांची नावे समोर आली असून त्यांचे नाव राजेश हवलदार आणि ललित आरक्षक असे आहे. डीएसपी नक्षल ऑपरेशन अजित ओंगरे यांनी सांगितले की, सकाळी आठच्या सुमारास जवान सीमेवर ड्युटीसाठी तैनात होते.
चेक पोस्टवर वाहनांचे चेकिंग सुरू होते. यावेळी अचानक नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांनी दुचाकींनासुद्धा आग लावली. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. सध्या नक्षलवाद्यांची संख्या किती होती आणि ते कुठून आले याचा तपास पोलिस करत आहेत.