नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना संसर्गाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. छगन भुजबळ हे सोमवारी येवला येथून परतत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णालयात त्यांची कोरोना चाचणी केली असता ते पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.
नाशिकमधील येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुकचे सुपुत्र वीर जवान अजित शेळके यांना नुकतेच देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अपघातात वीरमरण आले. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी काल सकाळी वीर जवान अजित शेळके यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यानंतर संध्याकाळी छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर लगेच त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यावेळी त्यांना थंडी, ताप असल्याने कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ते पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या त्यांच्यावर भुजबळ फार्म येथील राहत्या घरीच उपचार सुरू आहेत. सध्या छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन देखील छगन भुजबळ यांनी केले आहे.