NCP MLA disqualification case : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतप्रकरणी प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ३१ जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. परंतु, आता सर्वोच्च न्यायालयाने विधासनभा अध्यक्षांना मुदतवाढ दिली आहे.
जयंत पाटलांनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली..
महाधिवक्ता तुषार मेहता म्हणाले, शिवसेनेतील आमदार अपात्रप्ररकणी निकाल घेण्यास विधानसभा अध्यक्ष व्यस्त होते. त्यामुळे त्यांना वेळ पाळता आली नाही. राष्ट्रवादी आमदार अपात्रप्रकरणी कार्यवाही संपली आहे. परंतु, अध्यक्षांना आदेश देण्याकरता आणखी तीन आठवड्यांची आवश्यकता आहे.
३० ऑक्टोबर २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना ३१ जानेवारी २०२४ पर्यंत घटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. मुदत संपण्याच्या दोन दिवस अगोदर विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयात तीन आठवड्यांचा अतिरिक्त वेळ मागितला.