तरुण भारत लाईव्ह । मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभेतील संख्याबळ वाढावे यासाठी पक्षाच्या ज्येष्ठ आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची चाचपणी राष्ट्रवादीने सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत पक्षाची दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडली. दोन दिवसांच्या बैठकीत अनेक आमदारांची नावे लोकसभेसाठी चर्चेत आली. परंतु, त्यांना लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीच जास्त रस असल्याचे समजते.
शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीने २०१९ साली लढविलेल्या २२ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. लोकसभेच्या ज्या संभाव्य जागा राष्ट्रवादी लढविणार आहे, त्या मतदारसंघांत अपेक्षित उमेदवाराबाबत पक्ष सर्व्हे करणार आहे. या सर्व्हेत ज्या उमेदवाराला जास्त पसंती मिळेल, त्याला उमेदवारी देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
अनेक वर्षे आमदार असलेल्यांना लोकसभा निवडणुकीत उतरविण्याची चाचपणी राष्ट्रवादीने सुरू केली आहे. मात्र, अनेक आमदार लोकसभेची निवडणूक लढवायला तयार नाहीत. राज्यात महाविकास आघाडीसाठी चांगले वातावरण आहे. त्यामुळे विधानसभेत महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल आणि राज्यात सत्ता येईल, अशी आशा असल्याने अनेक आमदार लोकसभा लढविण्यास तयार नाहीत.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला मागील लढविलेल्या जागा मिळाव्यात, अशी भूमिका काहींनी मांडली. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने लढविलेल्या जागांपैकी ज्या ठिकाणी ठाकरे गटाचा खासदार आहे त्या जागा सोडण्याची वेळ आली तर तयारी ठेवावी लागेल, हे पवारांनी या बैठकीत सांगितल्याचे समजते.