राष्ट्रवादीने प्रसिध्द केली भगतसिंह कोश्यारींच्या नावावे मार्कशीट; वाचा काय म्हटलंयं

मुंबई : महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र कोश्यारी यांना जाता जाता राष्ट्रवादीने एक उपहासात्मक मार्कशीट प्रसिध्द करुन डिचवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हॉट्सअप विद्यालयाची ही मार्कशीट असल्याचं त्यात दाखवण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट केलेली मार्कशीट, त्याला प्रगती पुस्तक न म्हणता अधोगती पुस्तक म्हटलंय. त्यात विविध विषयांवरील त्यांची मार्क दाखवण्यात आले आहेत.

राष्ट्रावादीच्या ट्विटर अकाऊंटवर प्रसिध्द करण्यात आलेल्या या मार्कशीटवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तुकडी ढ असल्याचं नमूद करण्यात आलंय. इतिहास विषयात भोपळा, भूगोलात ३५, नागरिक शास्त्रात १७ , सामान्य त्रानात ३४ तर कला विषयात त्यांना १०० पैकी शंभर मार्क देण्यात आले आहेत. राज्यपालांनी महाराष्ट्रातील इतिहास पुरुषांवर केलेल्या भाष्यांवरून त्यांना इतिहासात ०० गुण देण्यात आले. या मार्कशीटमध्ये शेराही देण्यात आलाय. सदर विद्यार्थ्यीची बौद्धिक क्षमता पाहता पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. या विद्यार्थ्याची वर्तणूक पाहता, याची सुरुवात बालवाडीपासूनच सुरु करणे योग्य राहील, अशा शब्दात डिवचण्यात आले आहे.

उपहासात्मक पत्र व्हायरल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आलेल्या संदेशात एक पत्रही आहे. सदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी लिहिलेले हे पत्र असल्याचं अत्यंत खुमासदार पद्धतीने यात दाखवण्यात आलंय. आमच्या शाळेतील भगतसिंह कोश्यारी नामक विद्यार्थ्याला तत्काळ शाळेतून कमी करण्यात आले आहे. सदरहू विद्यार्थ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तसेच विद्यार्थ्याने सुधारणेचे कोणतेही चिन्ह न दाखवल्याने अखेर त्यांची गच्छंती करण्यात येत आहे असं या पत्रात नमूद करण्यात आलंय. सदर विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता अगदीच तोकडी असून मनोरंजनपर विषयात गती असली तरी बाकी विषयांचा अभ्यास कच्चा आहे. आपली जबाबदारी ओळखण्याऐवजी इतर विद्यार्थ्यांविषयी चुकीची माहिती पसरवण्याचे काम विद्यार्थ्याने केले आहे, असे त्या पत्रात म्हटलं आहे.