---Advertisement---

नीलम शिंदेच्या वडिलांना अखेर 14 दिवसांनी मिळाला व्हिसा!

---Advertisement---

सातारा : येथील रहिवासी आणि अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये मास्टर्सचे शिक्षण घेत असलेल्या नीलम शिंदे (Nilam Shinde) हिचा 14 फेब्रुवारी रोजी अपघात झाला. या अपघातात नीलम गंभीर जखमी झाली असून, ती सध्या कोमात आहे. तिच्यावर कॅलिफोर्नियातील हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, मृत्यूशी झुंज देणाऱ्या लेकीला पाहण्यासाठी तिचे वडील तानाजी शिंदे यांना तब्बल 14 दिवस अमेरिकन व्हिसासाठी संघर्ष करावा लागला. सरकारच्या मध्यस्थीनंतर अखेर त्यांना अमेरिकेचा व्हिसा मंजूर करण्यात आला आहे.

नीलमच्या वडिलांना 16 फेब्रुवारी रोजी या अपघाताची माहिती मिळाली. जखमी मुलीला पाहण्यासाठी आणि तिच्या उपचारांसाठी अमेरिकेला जाण्याची त्यांची धडपड सुरू झाली. मात्र, अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाकडून त्यांना सुरुवातीला प्रवेश नाकारण्यात आला. व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाइन स्लॉट बुक करावा लागतो, परंतु आठवडाभर प्रयत्न करूनदेखील स्लॉट मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा : सेवानिवृत्त सैनिकाने मुलाचा खून करून घेतला गळफास; कारण आलं समोर

सरकारच्या मध्यस्थीनंतर मिळाला व्हिसा
नीलमच्या कुटुंबीयांच्या संघर्षाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर गेली. त्यांनी तत्काळ दखल घेत संबंधित यंत्रणांना मदतीचे आदेश दिले. अखेर सरकारच्या मध्यस्थीनंतर 14 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तानाजी शिंदे यांना अमेरिकन वाणिज्य दूतावासात भेटीची वेळ मिळाली आणि त्यांना व्हिसा मंजूर करण्यात आला.

तानाजी शिंदे यांनी सांगितले की, “नीलम अजूनही आयसीयूमध्ये आहे. तिच्या प्रकृतीबाबत मोठी चिंता आहे. आम्हाला आता लवकरात लवकर अमेरिकेला जाऊन तिच्यासोबत राहायचं आहे. व्हिसा मिळाल्यानंतर आता विमानाचे तिकीट मिळताच आम्ही तिकडे रवाना होऊ.”

मीडियाच्या मदतीबद्दल आभार
नीलमचा चुलत भाऊ गौरव कदम म्हणाला, “मीडियाने जर आमची भूमिका घेतली नसती तर कदाचित आम्हाला व्हिसा इतक्या लवकर मिळाला नसता. त्यामुळे आम्ही सरकार आणि प्रसारमाध्यमांचे आभार मानतो.”

दरम्यान, तानाजी शिंदे यांनी सरकारकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, “अशा आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही कुटुंबाला व्हिसा मिळवण्यासाठी अडचणी येऊ नयेत. भविष्यात सरकारने यासाठी विशेष व्यवस्था करावी जेणेकरून कोणत्याही भारतीय कुटुंबाला आपल्या प्रियजनांसाठी झगडावे लागू नये.”

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment