---Advertisement---
जळगाव : मोबाईलवरील खेळांची सवय लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वाना जडलेली दिसते. मोबाईलवरील काही गेम खेळतांना पैसे द्यावे लागतात. लहान मुलांजवळ पैसे नसल्याने ते घरातील मोठ्यांकडे पैसे मागत असल्याचे दिसून येत असते. जर या मुलांना पैसे मिळाले नाही तर ते आकांडतांडव करतात अशी समस्या पालक मांडतांना दिसतात. मोबाईल गेममुळे काही मुलांनी आपले प्राण गमविल्याच्या घटना घडत असतात. अशातच अमळनेर येथे देखील मोबाईल गेमसाठी पैसे दिले नाहीत म्हणून भाच्याने आत्याला जखमी केल्याची घटना समोर आली आहे.
मोबाईलवरील खेळासाठी आत्याने पैसे दिले नाहीत म्हणून संतापलेल्या भाच्याने डोक्यात पकड मारून आत्याला गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी (१७ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता घडली. अमळनेर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
हलीमा बी अब्दुल रशीद (वय ५०, रा. ख्वाजा नगर, रेल्वे टाकी फाईल, अमळनेर) या जखमी झाल्या आहेत. घरी असताना हलीमाबी यांचा भाचा सकलैन मोहिद्दीन पिंजारी याने तिच्याकडे, मला पैसे लागणार आहेत पैसे दे. नाहीतर तुला आजोबांच्या घरात राहू देणार नाही अशी धमकी दिली. माझ्याकडे पैसे नाही असे हलीमाबी यांनी सांगताच सकलैन याने संतापून पकड तिच्या डोक्यात मारली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. हालिमाबी यांच्या वडिलांनी भांडण सोडवून तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
चक्कर येत असल्याने पुढील उपचारासाठी धुळ्याला हलवण्यात आले होते. उपचार घेऊन आल्यानंतर अमळनेर पोलीस स्टेशनला सकलैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता या तरुणाने मोबाईल मधील फ्री फायर गेमसाठी पैसे मागत असल्याचे सांगितले. गुन्ह्याचा तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.