भुसावळ : सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानावर आधारीत महानिर्मितीच्या दीपनगर प्रकल्पातील 660 मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक सहाचे ‘बाष्पक प्रदीपन’ (बॉयलर) गुरुवारी सकाळी 11 वाजता महानिर्मितीचे संचालक (प्रकल्प) अभय हरणे यांच्याहस्ते नियंत्रण कक्षातून कळ दाबून करण्यात आले. यावेळी मेसर्स भेल कंपनीचे महाव्यवस्थापक दिनेश जवादे, भुसावळ प्रकल्प आणि वीज केंद्राचे मुख्य अभियंते अनुक्रमे विवेक रोकडे, मोहन आव्हाड प्रामुख्याने उपस्थित होते.
महानिर्मितीचा 660 मेगावाट क्षमतेचा चौथा संच
भुसावळ येथे महानिर्मितीचे 500 मेगावॅट क्षमतेचे दोन संच (संच क्रमांक 4 व 5) आणि 210 मेगावाट क्षमतेचा एक संच या मधून नियमित वीज उत्पादन सुरू असून त्यामध्ये आगामी काही दिवसांत भर पडून भुसावळ वीज केंद्राची स्थापित क्षमता एक हजार 870 मेगावॅट इतकी होणार आहे. संच क्रमांक 6 चे अभियांत्रिकी, खरेदी आणि उभारणीचे काम मेसर्स भेल कंपनी करीत आहे. महानिर्मितीचा 660 मेगावॅट क्षमतेचा हा चवथा संच आहे. यापूर्वी कोराडी येथे प्रत्येकी 660 मेगावॅटच्या तीन संचांतून वीज उत्पादन सुरू आहे. चंद्रपूर 2920 मेगावाट, कोराडी 2190 मेगावाट नंतर आता भुसावळ 1870 मेगावाट हे महानिर्मितीचे तिसरे मोठे वीज उत्पादन केंद्र म्हणून साकारणार आहे. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून या संच क्रमांक 6 ला माहे जून 2023 मध्ये कार्यान्वित करण्याचे तसेच ऑगस्ट 2023 मध्ये हा संच पूर्ण क्षमतेने वाणिज्यिक तत्वावर वीज उत्पादन करेल असे प्रकल्प अधिकार्यांचे नियोजन आहे. भुसावळ प्रकल्पाचे अधिकारी-अभियंते-कर्मचारी-कामगार अथक परीश्रम घेत असल्याचे मुख्य अभियंता विवेक रोकडे यांनी सांगितले.
व्यवस्थापकीय संचालकांकडून आढावा
नुकतेच 20 फेब्रुवारी 2023 मध्ये महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन यांनी भुसावळ प्रकल्प स्थळी पाहणी करून प्रगतीपर कामांचा आढावा घेतला होता आणि बैठक घेऊन कामांना अधिक वेग देण्याचे निर्देश दिले होते. बाष्पक प्रदीपन यशस्वीरित्या झाल्याने महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन यांनी भुसावळ वीज प्रकल्पाचे सर्व अधिकारी-कर्मचारी आणि मेसर्स भेल कंपनी व अंतर्गत सर्व अधिकारी-कामगारांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
याप्रसंगी उप मुख्य अभियंते आर.एम. दुथडे, संतोष वकरे, प्रशांत लोटके, मनोहर तायडे, अधीक्षक अभियंते महेश महाजन, किशोर शिरभैय्ये, मनिष बेडेकर, योगेश इंगळे, पराग आंधे, राजु अलोने, सुमेध मेश्राम, सुनील पांढरपट्टे, महेंद्र पचलोरे, अतुल पवार, एस.एस.देशपांडे, कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ राजेश चिव्हाणे, कल्याण अधिकारी पंकज सनेर, सुधाकर वासुदेव प्रामुख्याने उपस्थित होते.