एसटीच्या ताफ्यात नव्या कोऱ्या ई-बसेस होणार दाखल!

मुंबई : इलेक्ट्रिक बस, बाईकला गेल्या काही दिवसांमध्ये लागलेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बॅटरी सर्टिफिकेशन केले जाणार आहे. बॅटरी सर्टिफिकेशन करण्याचे नियम बदलण्यात आले असून, एसटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसच्या बॅटरीला ‘आयकॅट’ या नोंदणी संस्थेकडून नवीन कोड देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता एसटीच्या ताफ्यात १५० नव्या कोऱ्या ई-बसेस दाखल होणार आहेत.
केंद्राच्या इलेक्ट्रिक बस धोरणांतर्गत एसटी महामंडळातसुद्धा इलेक्ट्रिक बसची खरेदी केली जात आहे. पहिल्या टप्प्यात १५० इलेक्ट्रिक बस एसटीच्या ताफ्यात दाखल करण्यात येणार असून नॉर्थ इंडियन आयकॅट कंपनीमध्ये सध्या या इलेक्ट्रिक बसेसच्या कोड सर्टिफिकेशनचे काम सुरू आहे. त्यामुळे या बस एप्रिलमध्ये दाखल होणार आहेत.
या बस प्रामुख्याने पुणे-मुंबई, पुणे-छत्रपती संभाजीनगर, पुणे-ठाणे, पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, पुणे-बोरिवली या मार्गांवर धावणार आहेत. सध्या एकमेव कार्यरत असणाऱ्या शिवाई एसटीच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने १ जूनला ताफ्यात पहिली ई-बस शिवाई दाखल झाली. त्यानंतर नऊ महिने झाले तरी दुसरी ई-बस दाखल झालेली नाही. एसटी महामंळाने सुमारे ५ हजार इलेक्ट्रिक बसेस घेण्याची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.