Pune News : पुणेकरांची होणार वाहतूक कोंडीतून सुटका, स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गावर नवीन स्थानकांची घोषणा

पुणे : शहराच्या वाहतूक समस्येवर मात करण्यासाठी नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांनी सोमवारी दोन नवीन मेट्रो स्थानकांची घोषणा केली. स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गावर ‘बालाजीनगर’ हे स्थानक महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून मान्यता मिळाल्याचे त्यांनी जाहीर केले. यासोबतच, पुणे मेट्रो प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी शिवाजीनगर येथील पुणे मेट्रो कार्यालयात एक महत्त्वाची बैठक घेतली.

माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, खडकवासला-खराडी मेट्रो मार्ग आणि एस.एन.डी.टी ते माणिकबाग मेट्रो जोडमार्ग या दोन्ही प्रकल्पांचे प्रस्ताव सध्या केंद्र सरकारकडे आहेत. त्याचबरोबर, वनाज ते चांदणी चौक मेट्रो मार्ग तसेच रामवाडी ते विठ्ठलवाडी हे दोन मार्ग अंतिम मंजुरीसाठी राज्य कॅबिनेटकडे प्रस्तावित आहेत. यामध्ये स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गावर अतिरिक्त स्थानकांचा समावेश करण्यात येणार आहे, ज्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

हेही वाचा : पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ‘ती’ जायची परपुरुषासोबत; मुलीला जाग आली अन् महिलेचं कांड उघड

“कात्रज ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे काम वर्क ऑर्डर मिळताच सुरू करण्यात येईल,” असे मिसाळ यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाच्या राबवणीनंतर पुण्यातील वाहतूक व्यवस्था अधिक कार्यक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : Sharon Raj murder case : विश्वास ठेवावा तर कुणावर ? प्रेयसीनेच केला घात, अखेर फाशीची शिक्षा

याच मार्गावर धनकवडी आणि बालाजीनगर मेट्रो स्थानक होण्यासाठी देखील प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पुणे शहरातील रिक्षा स्टँड, बस स्टँड यांचा आढावा घेऊन एक रोडमॅप तयार करण्याचे काम सुरू केले गेले आहे. यामुळे नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीची सुविधा अधिक सुलभ होईल.

बीआरटीएस योजनेच्या यशावर प्रश्न उपस्थित करताना, मिसाळ यांनी सांगितले की, पुण्यात बीआरटीएसने अपेक्षित यश मिळवले नाही. “बीआरटीएस हे वेगवान बस वाहतुकीचे समाधान होत नाही कारण बसची उपलब्धता अपुरी होती आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे ही योजना प्रभावी ठरली नाही,” असे त्यांनी नमूद केले.

येत्या काही महिन्यांत पीएमपीएमएल बस ताफ्यात १,००० नवीन बसेस समाविष्ट केल्या जातील, ज्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा सुधारणा होईल. पुण्यातील सर्व बस थांबे, रेल्वे स्थानके, मेट्रो स्थानके आणि रिक्षा स्टँड यांचे नकाशे तयार करण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत, जे शहरातील विविध ठिकाणी लावले जातील.

या सर्व उपाययोजनांच्या माध्यमातून पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल आणि पुणेकरांना अधिक सुव्यवस्थित, सुलभ वाहतूक सेवा मिळणार आहेत, असे मिसाळ यांनी सांगितले.