---Advertisement---
तळोदा : तालुक्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतरही येथे रस्ता नाही. ये आझादी झुठी है आदिवासी जनता दुखी है अशी म्हणायची वेळ आलीय. रस्त्याअभावी उपचारासाठी दवाखाना गाठता न आल्याने नवजात बालकास आपला जीव गमवावा लागला.
तळोदा तालुक्यातील इचगव्हाण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सातपुडा पर्वत रांगेत दुर्गम भागात येणाऱ्या नयामाळ येथील माता जानू सिमजी वसावे यांनी घरीच बाळाला जन्म दिला. प्रसूतीनंतर आईला व नवजात बालकास दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी नयामाळ येथून दवाखाना गाठण्यासाठी रस्ताच नसल्याने रविवारी (१४ सप्टेंबर) बाबूची झोळी करून ८ ते १० किलोमीटर पायपीट करत प्रसूती झालेल्या जानू वसावे यांना पती सिमजी वसावे, विलास वसावे, भतसिंग वसावे, नितेश वळवी, अनिल वसावे सोबत आशा वर्कर अनिता वसावे यांनी बाबूंच्या झोळीतुन इच्छागव्हाण गाठले. इच्छागव्हाण येथून वाहनाने मोदलपाडा आरोग्य केंद्रात आले.
परंतु, नवजात बालकास वेळेवर उपचार न मिळाल्याने अर्ध्या रस्त्यातच त्यावर जीव गमावण्याची वेळ आली. जन्मदात्या आईने टाहो फोडला परंतु आदिवासी विकास मंत्र्यांनी बहिरेपणाचे सोंग घेतल्याने कानठळ्या बसवून घेतल्या आहेत. नयामाळ येथील ग्रामस्थांना रस्ता नसल्याने आरोग्य, शिक्षण, शासकीय तसेच दैनंदिन बाजार कामासाठी रोजच पायपिट करावी लागते. आदिवासी विकास खात्याच्या निधी नयामाळ ग्रामस्थांसाठी नाही का? स्वतंत्र भारतात आजही रस्त्याअभावी जीव गमवावा लागतोय. शासन आपल्या दारी योजनेचा गवगवा करताना नयामाळसह ग्रामस्थांचा शासनाला विसर पडला असा प्रश्न उपस्थित होतो
नयामाळ येथील आदिवासी जनता मूलभूत सुविधांपासून आजही वंचित आहे. रस्त्याअभावी जीवास मुकावे लागत आहे.ही वस्तू स्थिती असून आता तरी प्रशासनाने त्वरित लक्ष घालून रस्त्याच्या कामाला सुरुवात करुन जबाबदारी व कर्तव्य पार पाडावे अशी मागणी करण्यात येत आहे.









