---Advertisement---
धुळे : सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून आतापर्यंत अनेक महिलांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या असून, या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. अशात धुळ्यात आणखी एका विवाहितेने हुंड्याच्या छळापायी आपल्या आयुष्याची अखेर केल्याची घटना उघडकीस आली आहे.
शिवानी रवींद्र कोळी (२५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या विवाहितेने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने धुळ्यात खळबळ उडाली आहे.
धुळेच्या वेल्हाणे येथे शिवानी रवींद्र कोळी (२५) या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी धुळे तालुका पोलिसांत पती रवींद्र दयाराम कोळी आणि सासू रत्नाबाई दयाराम कोळी (दोघे रा. वेल्हाणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सत्यवान मोहन कोळी (वय ४२, रा. नेर, ता. जि. धुळे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिवानी आणि रवींद्र यांच्या लग्नानंतर रवींद्रला गॅरेज टाकण्यासाठी सासरहून ५० हजार रुपयांची मागणी करण्यात येत होती. शिवानीने हे पैसे न आणल्याने तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता.
या त्रासाला कंटाळून शिवानीने आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक कृष्णा पाटील करत आहेत.
---Advertisement---