मुंबई : भारतीय शेअर बाजाराने आज ऐतिहासिक टप्पा गाठला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने (NSE Nifty) पहिल्यांदाच 20 हजार अंकांचा टप्पा गाठला. निफ्टीने 19,000 ते 20,000 अंकांचा टप्पा हा 52 ट्रेडिंग सेशनमध्ये अर्थात व्यवहाराच्या 52 दिवसांत गाठला. दुसरीकडे आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने (Sensex) पुन्हा एकदा 67 हजार अंकांचा टप्पा गाठला. आज दिवसभरातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्स 550 अंकांच्या तेजीसह 67,156 अंकावर स्थिरावला. तर, निफ्टी निर्देशांक 176.40 अंकाच्या तेजीसह 19,996.35 अंकांवर बंद झाला. त्याआधी त्याने 20 हजार अंकांच्या टप्पा ओलांडला. दरम्यान, गुंतवणूकदारांनी एका दिवसात ३ लाख कोटी रुपये कमावले.
हे शेअर्स वधारले
बीएसई सेन्सेक्सवर अॅक्सिस बँक, पॉवर ग्रिड आणि मारुतीचे शेअर्स सुमारे दोन टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. याशिवाय एसबीआय, टाटा मोटर्स, आयटीसी, नेस्ले इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, टीसीएस आणि एनटीपीसी यांचे शेअर्सही वाढीसह बंद झाले. याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज, जेएसडब्ल्यू स्टील, कोटक महिंद्रा बँक, एचयूएलचे शेअर्सही वधारले. तर दुसरीकडे बजाज फायनान्स, लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
कोणत्या सेक्टरमध्ये खरेदीचा जोर?
बँकिंग स्टॉक्समध्ये आज खरेदीचा जोर दिसून आला. बँक निफ्टीमध्ये 414 अंकांच्या तेजीसह 45,570 अंकांवर स्थिरावला. तर, आयटी, ऑटो, एनर्जी, एफएमसीजी, मेटल्स, फार्मा, हेल्थकेअर सारख्या सेक्टरमध्ये खरेदी दिसून आली. मिड कॅप स्टॉक्समध्येही तेजी दिसली. मिड कॅप निर्देशांक 466 अंकांनी वधारत 41,444 अंकांवर बंद झाला. स्मॉल कॅप इंडेक्स हा 170 अंकांच्या तेजीसह 12,982 अंकांवर बंद झाला. निफ्टी निर्देशांकातील 50 कंपन्यांपैकी 45 कंपन्यांचे शेअर्स वधारले. तर सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 28 कंपन्यांचे शेअर वधारले.
गुंतवणूकदार मालामाल
मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात मोठी वाढ झाली. आज 11 सप्टेंबर रोजी बाजार भांडवल हे 324.25 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवार, 8 सप्टेंबर रोजी 320.94 लाख कोटी रुपये होते. आजच्या तेजीमुळे मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल सुमारे 3.31 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.