निलडोह-डिगडोह पाणीपुरवठा योजनेला मार्चपर्यंत मुदतवाढ : गुलाबराव पाटील

हिंगणा : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील इसासनी-वागधरा तसेच निलडोह-डिगडोह पाणी पुरवठा योजनेची कामे डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. तथापि या कामांची अंतिम टप्प्यातील उर्वरित कामे पाहता या कामांना मार्च महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना  नागपूर हिवाळी अधिवेशनात विधानसभेत लक्षवेधी मांडली. यावेळी आमदार मेघे यांनी डिगडोह-निलडोह व वागदरा-इसासनी पाणीपुरवठा योजनांची कामे संथगतीने सुरू असल्याचे सांगून मंत्र्यांचे लक्ष वेधले.

तसेच कंत्राटदार अधिकाऱ्यांचे ऐकत नसल्याची माहिती दिली. यावर मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, इसासनी-वागधरा योजनेला २८ डिसेंबर २०१८ रोजी तर निलडोह-डिगडोह पाणी पुरवठा योजनेला ४ फेब्रुवारी २०१९ रोजी मान्यता देण्यात येऊन १७ सप्टेंबर २०१९ रोजी कामाचे कार्यादेश देण्यात आले होते. या योजनांचा मूळ कालावधी १८ महिन्यांचा होता.

कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे कामे बंद असल्याने कामांना उशीर झाला. कंत्राटदाराने कोरोना कालावधी वगळता इतर कालावधीमध्ये बारचार्टप्रमाणे कामे पूर्ण न केल्याने कंत्राटदारावर १६ सप्टेंबर २०२१ पासून दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.

आता ही कामे अंतिम टप्प्यात आली असून उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी मार्च महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. कंत्राटदाराला दोन्ही योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा अतिरिक्त कालावधी मिळणार आहे. या कालावधीत कामे पूर्ण करण्याचे आश्वासन कंत्राटदारदाराने दिले आहे.

…अन्यथा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार
हिंगणा विधानसभा क्षेत्रातील डिगडोह- निलडोह पाणीपुरवठा योजनेला चार वर्षे व वागदरा-इसासनी पाणीपुरवठा योजनेला पाच वर्षे झाली. योजनेचा कालावधी १८ महिन्यांचा होता. कंत्राटदारांची मुदत संपली आहे. तरीही तीन महिन्यांचा कालावधी वाढवून दिला आहे. मार्च २०२४ काम पूर्ण न झाल्यास कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात येईल, अशी घोषणा विधानसभेत गुलाबराव पाटील यांनी केली.