मोठी बातमी ! सुजय विखेंच्या ‘त्या’ मागणीवर निवडणूक आयोगाचा निर्णय; आता काय होणार ?

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. यामुळे त्यांनी काही केंद्रांवरील मतांची पुन्हा मोजणी करावी, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. आता या प्रकरणी निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक आयोगाला महत्त्वाची सूचना दिली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्देशांमुळे सुजय विखेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने अनेकांना जोरदार धक्का बसला. यात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. या मतदारसंघात भाजपकडून सुजय विखे पाटील यांना तिकीट देण्यात आलं होत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने निलेश लंकेंना उमेदवारी दिली होती. यात निलेश लंकेंनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केला होता. यानंतर सुजय विखे पाटील यांनी मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता.याप्रकरणी सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला तक्रार केली होती. आता या तक्रारीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.

काय आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय ?
सुजय विखेंनी आक्षेप घेतलेल्या 40 मतदान केंद्रांवर मॉकपोल घ्यावा, अशी सूचना जिल्हा निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. त्यामुळे आता आक्षेप घेण्यात आलेल्या बुथवरील ईव्हीएमची मेमरी रिकामी करुन मतांची पडताळणी केली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्देशांमुळे सुजय विखेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

कसा होणार मॉकपोल ?
आक्षेप घेण्यात आलेल्या 40 ईव्हीएम मशिनची मेमरी रिकामी केली जाणार आहे. यात एका मशिनमध्ये प्रत्येकी 1 ते 1400 मतं टाकता येणार आहेत. यात किती मतं द्यायची हे ठरवण्याचे अधिकार उमेदवारांना असणार आहे. यावेळी व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएममशिनवरील मतांची पडताळणी होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. आता ही प्रक्रिया नेमकी कधी पार पडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.