मुंबई : भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी राजकारणातून अचानक एक्झिट घेत असल्याची घोषणा दसऱ्याच्या दिवशी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि राणे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वादंग सुरु आहेत. त्यात निलेश राणेंच्या या निर्णयानं हा वाद चव्हाट्यावर आला. कुडाळ-मालवण मतदारसंघातून निलेश राणे तयारी करत होते अशावेळी त्यांनी राजकारण सोडणार असल्याचं म्हटलं त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले. चव्हाण-राणे वादात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यस्थी करणार आहेत.
रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू मानले जातात. फडणवीसांच्या प्रत्येक रणनीतीत चव्हाणांचा मोठा वाटा असतो. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ते सुपुत्र निलेश राणे हे माजी खासदार आहेत. कोकणातील राजकारणात निलेश राणे सक्रीय आहेत. रवींद्र चव्हाणांच्या एकाकी कारभारावर राणे कुटुंब नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. त्यातून कोकणात भाजपा कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमावस्था निर्माण झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी भाजपाला परवडणारी नाही. त्यामुळे रवींद्र चव्हाणांनी निलेश राणेंची भेट घेतली. त्यानंतर हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घ्यायला त्यांच्या सागर बंगल्यावर गेले.
या बैठकीत नेमकं राजकारणातून सन्यास घेण्यामागचं कारण काय? रत्नागिरीपासून सिंधुदुर्गपर्यंत कोणत्या कार्यकर्त्यांवर अन्याय करण्यात आलाय? निलेश राणे नाराज का आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न रवींद्र चव्हाणांनी केला. निलेश राणे निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. त्यात ते लोकसभा लढवणार की कुडाळ मालवण मतदारसंघ लढवणार हे स्पष्ट नाही. निलेश राणेंची मनधरणी रवींद्र चव्हाणांकडून केली जात आहे. लवकरच माध्यमांसमोर आपण येऊ असं निलेश राणेंनी पत्रकारांना म्हटलं आहे.