सांगीतिक श्रीमंतीची नव्वदी!

तरुण भारत लाईव्ह । उत्तरा केळकर। कोणत्याही कलाकाराच्या कारकीर्दीच्या आलेखाचा परीघ फार मोठा असतो. त्यातच आशा भोसलेंसारख्या असामींची कारकीर्द एका लेखात बसवणे जवळपास अशक्यच; तरीही एखादे वेळी लहान तोंडी मोठा घास घेत आपल्या गुरुस्थानी असणार्‍या कलावंताबाबत लिहिण्याची संधी मिळते. आशाताईंना 90 वर्षे पूर्ण होत आहेत, ही संपूर्ण संगीत क्षेत्रासाठी फारच आनंदाची बाब आहे. आपल्यातील प्रत्येकानेच आशाताईंच्या गाण्यांचा आस्वाद घेतला. त्यांच्या सुरांनी कधी आनंद दिला तर कधी डोळा पाणी आणले. एखाद्या कलाकाराच्या गायकीने संपूर्ण देशाच्या मनात घर होऊ शकते, हे आपण याची देही याची डोळा अनुभवले ते आशाताईंमुळे!

आजपर्यंत विविध कारणांमुळे आशाताईंना भेटण्याचा योग आला. त्यातून त्यांच्या दिलखुलास आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्वातील अनेक बारकावे समोर आले. आशाताईंबद्दल सगळ्यात विशेष बाब म्हणजे त्या अजूनही तरुण आहेत. त्या दिसतात तरुण, राहतात तरुण; त्यांच्या आचरणातही चिरतरुण भाव आहेत. आशाताई नव्वदाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने दुबईमध्ये कार्यक्रम करणार आहेत, हे समजल्यावर अचंबित झाले. वयाची नव्वदी गाठणार म्हटल्यावर थकलेल्या, घरात झोपून राहिलेल्या व्यक्ती डोळ्यांसमोर येतात. आशाताईंनी जणू ‘म्हातारपणा’ची व्याख्याच बदलली आहे. आशाताई आजही एकदम टापटिप राहतात, ग्रेसफुल दिसतात. 90 वर्षांची एवढी उत्साही व्यक्ती मी आजपर्यंत पाहिलेली नाही. या वयातही त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली आहे. त्यांना आजही प्रत्येक गाण्याच्या ओळी आठवतात. त्याचबरोबर विविध गाण्यांच्या रेकॉर्डिंगच्या वेळी घडलेले किस्से, गंमतीजमतीही त्यांना व्यवस्थित आठवतात.

परवाच एका व्हिडीओमध्ये ‘मी इंडस्ट्रीमधील शेवटची मुघल आहे’ असे त्या म्हणाल्या तेव्हा हे विधान किती खरे आहे, याची क्षणार्धात प्रचीती आली. त्यांनी इंडस्ट्रीमधील बदलाचे वारे लीलया झेलले आहेत. मूळ गाण्यांची नजाकत जपण्यापासून रिमिक्सच्या जमान्यापर्यंत त्यांनी संगीत क्षेत्रात झालेला प्रत्येक बदल अगदी जवळून अनुभवला आहे. संगीत क्षेत्राशी निगडित प्रत्येक कलाकार, संगीतकार, गीतकार यांच्या कारकीर्दीमधील चढउतार आशाताईंनी खूप जवळून बघितले आहेत. त्यातील अनेकांना वेळप्रसंगी प्रोत्साहन दिले आहे. मलाही कारकीर्दीच्या सुरुवातीला आशाताईंनी खूप प्रोत्साहन दिले होते. माझे त्यांच्याशी आजही सलोख्याचे संबंध आहेत. मध्यंतरी एकदा आशाताईंवर लिहायची संधी मिळाली. तेव्हा मी लिहिलेला लेख फोनवर वाचून दाखवते असे म्हटल्यावर त्यांनी ‘माझ्यासमोर बसून लेख वाचून दाखवायचास’ असा आग्रह धरत घरी बोलावले.

आशाताईंकडून सगळ्यात प्रकर्षाने शिकण्यासारखी बाब म्हणजे जगण्यामागची प्रेरणा! आजवरच्या आयुष्यात त्यांच्यावर संकटांचा डोंगर कोसळला. डोळ्यांदेखत दोन मुले देवाघरी गेली. आर्थिक स्थैर्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. आज लक्ष्मीचा वरदहस्त असला तरी वयानुसार आलेल्या समस्या कोणाला चुकल्या आहेत? वयाची नव्वदी गाठूनही प्रत्येक समस्येला हसतमुखाने सामोरे जाणे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे, असे मला वाटते. ‘सलाम’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आशाताईंकडून खूप काही शिकायला मिळाले. आशाताईंच्या कारकीर्दीवर अवलंबून असलेल्या या कार्यक्रमासाठी अर्थातच त्यांची परवानगी घेतली. परवानगीसोबत त्यांनी वरदहस्तही दिला, असे म्हणायला हरकत नाही. आशाताईंनी गायलेली गाणी म्हणण्याचा प्रयत्न करणे हा गळ्याचा व्यायाम आहे, या विधानाशी प्रत्येकच गायक सहमत असेल. पूर्वीच्या गाण्यांमधील गोडवा आणि नजाकत आता कुठेतरी हरवली आहे, असे वाटल्यावाचून राहवत नाही. पूर्वी गाण्यांच्या चालीमध्ये काही अवघड जागा असत. त्या जागा गायकांची खासियत म्हणून ओळखल्या जात. आशाताईंचे संपूर्ण गाणेच अशा जागांनी भरलेले असते.

आशाताईंनी मिळालेल्या प्रत्येक गाण्याचे सोने केले. एखाद्या सुमार चालीचे गाणेही वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. त्यांची गाणी गाताना गळ्याचा आणि कलेचाही व्यायाम होतो. त्यामुळे मी ‘सलाम’ या कार्यक्रमामध्ये आशाताईंची गाणी म्हणण्याचा भाबडा प्रयत्न करीत असते. त्यांनी गायलेली गाणी हीसुद्धा एक मोठी शिकवणी आहे, हे गाताना समजते. त्यांनी अजरामर केलेली गाणी शंभर टक्के परफेक्ट आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यातील एक टक्का गायकी आत्मसात करता आली तरी कार्यक्रमाची फलश्रुती झाल्यासारखे वाटेल. याच कार्यक्रमाविषयी चर्चा करताना आशाताईंचा उदात्तपणा समोर आला. त्यांनी कार्यक्रमात प्रचंड रस दाखवला. नेहमीप्रमाणे मला प्रोत्साहन दिले. कार्यक्रमासाठी गाण्यांची निवड करतानाही त्यांचा सक्रिय सहभाग होताच. निवड प्रक्रियेमध्ये त्यांच्या आवडीची गाणी घेण्याचा आग्रहसुद्धा होता. एखादे गाणे कार्यक्रमात का घेतले नाही, असेही त्या हक्काने विचारतात.

एकदा सहज बोलता बोलता त्यांनी कार्यक्रमाला यायची इच्छा असल्याचे बोलून दाखवले. पण प्रेक्षकांना आशाताईंची गाणी म्हणून दाखवणे आणि खुद्द ताईंसमोर त्यांची गाणी गाण्याचा प्रयत्न करणे यामध्ये हिमतीची तफावत असल्याचे तेव्हा प्रकर्षाने जाणवले. आभाळाएवढे काम करूनही मंगेशकर कुटुंबीयांमध्ये अहंकाराला थारा नाही. आशाताई ममतेने विचारपूस करतात तेव्हा आयुष्यात काही कमावण्यामध्ये यशस्वी झाल्यासारखे वाटते. त्यामुळेच त्यांच्याकडे जाताना कोणताही संकोच वाटत नाही. केव्हाही आशाताईंकडे गेल्यावर खाद्यपदार्थांची रेलचेल असते. एका अन्नपूर्णेप्रमाणे आदरातिथ्य करण्यामध्ये त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही. त्यांच्या दिलखुलास स्वभावामुळे प्रत्येक भेटीनंतर अनुभवश्रीमंत वाटते.

आशाताईंच्या भेटीविषयी बोलताना एक प्रसंग आवर्जून लिहावासा वाटतो. त्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मी भेटायला गेले होते. आपल्या मुलाचे अकाली जाणे हा एका आईसाठी किती जीवघेणा प्रसंग! पण तरीही त्या रडत नव्हत्या. ‘मुलाच्या विरहामध्ये रडायचे नाही असे मी ठरवले आहे’ हे आम्हाला सांगताना त्यांनी धीर कुठून आणला असेल? एकदा सहजच भेटायला गेले असता त्या खोलीत एका पंजाबी गाण्याचा रियाज करत बसल्या होत्या. कसला रियाज करता आहात, असे विचारले असता त्यांनी मिश्कीलपणे सांगितले, ‘अगं, माझा पंजाबमध्ये कार्यक्रम आहे. तिथल्या प्रेक्षकांना आवडेल यासाठी पंजाबी गाण्याने सुरुवात करेन म्हणते! त्याचाच रियाज करत बसले आहे.’ त्यांच्या या उत्तराने अवाक् झाले. या वयातही कलेप्रती एवढे समर्पण क्वचितच पाहायला मिळते. आजही त्यांच्या लाईव्ह कार्यक्रमांमध्ये उत्साहाचा झरा वाहत असतो. कार्यक्रमामध्ये गाण्यांदरम्यान साडी बदलणे असो किंवा चाहत्यांच्या फर्माईशीला न्याय देणे असो, एवढा उत्साह त्यांच्यामध्ये कुठून येतो हे समजण्यासाठी आपला सारा जन्मच अपुरा पडेल! आपण त्यांच्यापेक्षा सर्वार्थाने लहान असलो तरी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कोटी कोटी प्रार्थना! त्यांच्या गायकीची अनुभूती मिळत राहण्यासाठी त्यांचे गायन अबाधित राहो हीच सदिच्छा!