मुंबई: ”छत्रपती संभाजीनगर येथील कॅबिनेट बैठकीत मराठवाड्यासाठी झालेल्या निर्णयांमुळे विरोधक धास्तावले आहेत. मराठवाड्याला भरभरून देण्याचे काम आमचे सरकार करत आहे. या सगळ्या बाबींना पणवती लावण्याचे काम उबाठा सेना करत आहे.
बैठकीनिमित्त हॉटेल व्यावसायिकांना मिळणारे पैसे यांना बघवत नाहीत. मविआ सरकार सत्तेत असताना सरकारच्या पैशांवर हे लोक जगले अन आमच्यावर आता टीका करत आहेत. आदित्य ठाकरे आता शेतकऱ्यांकडे जात आहेत. मात्र, त्यांची अवस्था सत्ता असताना डिनो मोरियाच्या खांद्यांवर आणि विरोधात असताना शेतकऱ्यांच्या बांधावर अशी झाली आहे,” अशीही खोचक टिप्पणी करत भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आदित्य ठाकरेंसह संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर आमदार नितेश राणे यांनीसडकून टीका केली. ते म्हणाले की, ”आज मंत्र्यांसाठी बुक केलेल्या हॉटेलच्या खर्चावर उबाठा गटाचे नेते टीका करतायत. मात्र, जेव्हा अशाच प्रकारचा खर्च संजय राऊत यांचा मालक आणि त्यांचा मुलगा करतो तेव्हा कुणी प्रश्न विचारात नाही की तो खर्च कुणाचा होता ?” असा सवाल राणेंनी विचारला आहे.