मुंबई : मोदींच्या नावावर १८ खासदार निवडून दिले तेव्हा EVMवर आक्षेप घेतला का नाही? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना विचारला आहे. एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी मंगळवारी केले होते. यावर आता नितेश राणेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
त्यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत ठाकरे आणि राऊतांना जाब विचारला आहे. नितेश राणे म्हणाले की, “चारपैकी तीन राज्यामंध्ये भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर लगेच उद्धव ठाकरे आणि त्यांचे कामगार एक निवडणुक बॅलेट पेपरवर घ्या असा आग्रह धरु लागले. परंतू, हाच आग्रह कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर का केला नाही? कारण मातोश्रीची नवीन मम्मी रागवणार म्हणून का? २०१४ आणि २०१९ मध्ये दोन्ही निवडणुकांमध्ये जेव्हा मोदीजींच्या आशिर्वादामुळे तुमचे १८ खासदार निवडून आलेत, तेव्हा बॅलेट पेपर आठवलं नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे.
— nitesh rane ( Modi ka Parivar ) (@NiteshNRane) December 6, 2023
पुढे ते म्हणाले की, “तुम्ही एवढ्या संविधानाच्या गप्पा मारताय तर तुमच्या उबाठा गटात संविधान आहे का? संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर दोन्ही विधानपरिषद आणि राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि परत निवडून येऊन दाखवावं,” असे ते म्हणाले.
तसेच युवासेना नेते वरुण सरदेसाई यांचे नाव न घेता ते म्हणाले की, “तुम्ही आता संविधानाच्या गप्पा मारताय, मग आम्ही ऐकतोय की, मुंबई पदवीधर निवडणुकीचा उमेदवार हा सरकारी भाचाच आहे. मग तेव्हा तुम्हाला सामान्य शिवसैनिक आठवत नाही का? उबाठा हा अपक्ष आहे की, पाठणकर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का याचं उत्तर द्या. देशात संविधान आहे की, नाही हे विचारण्याआधी तुमच्या उबाठामध्ये संविधान आणि लोकशाही आणा मग दुसऱ्यांना सल्ले द्या,” असेही नितेश राणे म्हणाले आहेत.