‘या’ महामार्गाविषयी नितीन गडकरींनी दिली मोठी अपडेट

रायगड : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज रायगड दौर्‍यावर आले असून त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते कासु या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भुमीपुजन केले. यावेळी त्यांनी महामार्गांवरील ब्लॅक स्पॉट शोधून त्यावर उपाय योजना कराव्यात यासाठी जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात आल्याची माहिती दिली. देशात दरवर्षी ५ लाख अपघातात दीड लाख मृत्यूमुखी पडतात असे सांगत हे अपघात टाळण्यासाठी समिती तयार करण्यात आल्याचे ही नितिन गडकरी म्हणाले.

कार्यक्रमात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी वाढत्या रस्ते अपघातांवर चिंता व्यक्त केली. कोविडमुळे, युद्धामुळेही मरत नाहीत, त्यापेक्षा जास्त जीव रस्ते अपघातात गमवावे लागतात असे म्हणत लेन डिसिल्पिनचे महत्व नितीन गडकरी यांनी विषद केले. वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी अपघात निवारण समिती स्थापन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या समितीच्या मार्फत दर दोन महिन्यांनी ब्लॅक स्पॉट, अपघात स्थळांची पाहणी करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

मुंबई-गोवा महामार्गाची केली हवाई पाहणी

या दौऱ्यावेळीच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांन मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी हेलिकॉप्टरमधून त्यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी मार्गाच्या कामाच्या प्रगतीचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. तसेच अपूर्ण राहिलेल्या कामांसंदर्भात अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या.