व्हिडीओवरुन नितीन गडकरींची मल्लिकार्जुन खरगेंना नोटीस; वाचा काय आहे प्रकरण…

नागपूर : केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते नितीन गडकरी यांच्या एक व्हिडीओवरुन सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. याप्रकरणात नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांना नोटीस पाठवली आहे. काँग्रेसने तीन दिवसात माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गडकरी यांनी दिला आहे.

काँग्रेसने  एक व्हिडीओ शेअर केला आहे. १९ सेकंदांच्या या व्हिडीओत नितीन गडकरी हे गरीब, शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक यांच्याविषयी बोलताना दिसत आहेत. “ग्रामीण भागातील नागरिक, गरीब लोक, कामगार, शेतकरी हे दु:खी आहेत. ग्रामीण भागात चांगले रस्ते नाहीत. पिण्यासाठी पाणी नाही. चांगली रुग्णालये नाहीत. उत्तम प्रतिच्या शाळा नाहीत,” असे गडकरी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.

काँग्रेसने शेअर केलेल्या या व्हिडीओत गडकरींचे पूर्ण विधान दिलेले नाही. वरील विधानांच्या अगोदर नितीन गडकरी हे शहरी भागातील स्थलांतरावर बोलले आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी यासाठी एनडीए सरकारकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांविषयी गडकरी बोलत आहेत. मात्र गडकरींची ती विधाने काँग्रेसने ट्वीट केलेल्या व्हिडीओत नाहीत.

हा व्हिडीओ १९ सेकंदांचा असून त्याचा उपयोग बदनामी तसेच भाजपाच्या नेत्यांत संभ्रम निर्माण करण्यासाठी केला जातोय. गडकरी यांनी केलेल्या एका विधानाचा चुकीचा अर्थ लावून तसा व्हिडीओ समाजमाध्यमांवर टाकण्यात आला. या व्हिडीओशी छेडछाड करण्यात आलीय. या व्हिडीओच्या माध्यमातून करण्यात आलेला दावा हा संदर्भहीन असून त्याला कोणताही आधार नाही,” असे नोटीसीत म्हटले आहे.