नवी दिल्ली : संसदेत पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. मणिपूर मुद्द्यावरून काँग्रेस आणि बीआरएसने मोदी सरकारविरोधात दोन वेगवेगळ्या अविश्वास प्रस्तावाच्या नोटिसा दिल्या होत्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रस्तावाची नोटीस मंजूर केली आहे. जनतेचा सरकारवरील विश्वासाला तडा जात असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. पंतप्रधान मोदींनी मणिपूरवर बोलावे अशी आमची इच्छा आहे, पण ते ऐकत नाहीत, म्हणून आम्ही अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
मणिपूर हिंसेने संपूर्ण देशाचं राजकारण ढवळून निघाले आहे. अविश्वास ठरवाच्या निमित्ताने तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेवर निवदेन देतील, अशी आशा विरोधकांना आहे. काँग्रेस आणि भारत राष्ट्र समितीच्या वतीने लोकसभा अध्यक्षांना याबाबत पत्र देण्यात आलं होतं. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांची सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाची सूचना लोकसभेत मंजूर झाली आहे. प्रस्तावाच्या सूचनेला सभागृहातील आवश्यक 50 सदस्यांचा पाठिंबा मिळाला आहे.
मणिपूरमध्ये ३ मेपासून हिंसाचार सुरूच आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून पावसाळी अधिवेशनात गदारोळ सुरू आहे. विरोधी पक्ष पंतप्रधान मोदींनी बोलण्यासाठी आणि या मुद्द्यावर सभागृहात सविस्तर चर्चा करण्याची मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने अविश्वासाची नोटीस दिली आहे. अध्यक्ष परवानगी देणार की नाही, याची उत्सुकता सर्वांना होती. मात्र त्याला परवानगी मिळाली आहे. आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला अविश्वास प्रस्तावासाठी तारिख आणि वेळ ठरवतील. त्यानुसार अविश्वास ठराव मांडण्यात येईल.
पंतप्रधान मोदींनी ५ वर्षापूर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरली
विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यानंतर आता सोशल मीडियात एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. जो नरेंद्र मोदींचा पहिल्या कार्यकाळात केलेल्या भाषणाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात भाषण देण्यासाठी उभे होते. त्यांनी विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर खडेबोल सुनावले होते. ५ वर्षापूर्वी पंतप्रधान मोदींनी राजकीय भविष्यवाणी केली होती. २०२३ मध्ये विरोधक अविश्वास प्रस्ताव आणतील असं त्यांनी म्हटलं होते.
आज मोदी सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना नोटीस दिली आहे. ७ फेब्रुवारी २०१९ रोजी संसदेत भाषण करतांना मोदी म्हणाले होते की, तुम्ही इतकी तयारी करा, इतकी तयारी करा की २०२३मध्ये पुन्हा तुम्हाला अविश्वास प्रस्ताव आणण्याची संधी मिळेल. मोदींच्या या विधानावर सभागृहात हशा पिकला.