भारत हिंदू राष्ट्र नाही, नोबेल विजेते अमर्त्य सेन यांची काँग्रेस आणि भाजपावर टीका

नवी दिल्ली : “भारताला हिंदू राष्ट्र बनविण्याची कल्पना मला योग्य वाटत नाही. भारत हे हिंदू राष्ट्र नाही, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे”, असे विधान नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवरून त्यांनी सत्ताधारी भाजपाला टोला लगावत भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात एक सर्वसमावेशक संविधान असताना आपल्या पुढाऱ्यांनी राजकीय उदारमतवाद दाखवायला हवा, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

माध्यमांशी बोलताना अमर्त्य सेन यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले, याबाबत पीटीआय वृत्तसंस्थेने बातमी दिली आहे. ते म्हणाले की, माझ्या लहानपणी ब्रिटिश राजवटीत मी या गोष्टी पाहिल्या होत्या. न्यायालयीन सुनावणीला टाळून नेत्यांना तुरुंगात डांबले जात होते. मला वाटतं भारत यापासून कधीतरी मुक्त होईल. काँग्रेसच्या सरकारच्या काळातही हे बदलले नाही, तो त्यांचा दोष होता. पण सध्याच्या सरकारच्या काळात ही पद्धत अधिक प्रचलित झाली आहे”, अशा शब्दांत सेन यांनी काँग्रेस आणि भाजपावर टीका केली.

गेल्या काही निवडणुकांनंतर देशात काय झाले, हे आपण पाहिले. काही नेत्यांना कायदेशीर प्रक्रियेशिवाय तुरुंगात टाकले जात आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत चालली आहे. हे सर्व थांबायला हवे”, अशी अपेक्षाही अमर्त्य सेन यांनी व्यक्त केली. नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी भाजपाच्या अयोध्येतील पराभवाबाबतही भाष्य केलं.