राजकारणात अपघाताने काहीच घडत नसतं, जर..; संजय राऊताचं सूचक ट्विट

मुंबई : शरद पवारांनी लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा केली होती. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. शरद पवारांनी पुढील निर्णय घेण्यासाठी समिती निवडली होती. त्यानुसार, आज झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी अध्यक्षपदावर राहावं, असं सांगत राजीनामा फेटाळण्यात आला आहे. या राजकीय गोंधळात खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन सूचक विधान केलं आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्याच दिवशी नवा अध्यक्ष निवडण्यासाठी समितीचीही घोषणा केली होती. या समितीची बैठक शुक्रवारी सकाळी मुंबईतील पक्षाच्या कार्यालयात झाली. त्यानंतर शरद पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आला. मुळात या समितीत असलेल्या बहुतांश नेत्यांनी पहिल्याच दिवशी पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी जाहीरपणे केली होती. त्यामुळे समिती राजीनामा फेटाळेलच अशीच अटकळ बांधली जात होती, त्यानुसार राजीनामा फेटाळण्यात आला आहे.

दरम्यान, सत्तासंघर्षाचा निकाल, शरद पवारांचा राजीनामा, वज्रमुठ सभा आणि राजकीय अनिश्चितता या दरम्यान, संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलंय. ‘राजकारणात अपघाताने काहीही घडत नाही. तसे झाल्यास, तुम्ही शर्यत लावू शकता की ते कशाप्रकारे नियोजित होते’. असे विधान संजय राऊत यांनी केलं आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष फ्रँकलीन डी. रुझवेल्ट यांचं हे वाक्य ट्विट करुन संजय राऊत यांनी नेमकं काय सूचवलंय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.