नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील माफिया आणि समाजवादी पक्षाचा माजी खासदार अतिक अहमद यास प्रयागराज येथील एमपी – एमएलए न्यायालयाने त्याच्यावरील १०० पैकी पहिल्या खटल्यात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
बहुजन समाज पक्षाचे आमदार राजू पाल यांच्या २००५ साली झालेल्या हत्याकांडातील साक्षीदार उमेश पाल यांचे अपहरण केल्याप्रकरणी माजी खासदार अतिक अहमद याच्यावर दाखल खटल्याचा न्यायालयाने मंगळवारी निर्णय दिला. यावेळी अतिक अहमद यास भादंवि कलम ३६४ असह अनेक कलमांतर्गत दोषी ठरविले. त्यानंतर अतिक अहमदसह दिनेश पासी खान आणि शौलत हनिफ या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचप्रमाणे न्यायालयाने एक लाख रूपयांचा दंडही ठोठावला असून ती रक्कम उमेश पाल यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.
सुनावणीत सरकारी वकिलांनी जास्तीत जास्त शिक्षेची शिफारस करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची विनंती केली. तर अतिक अहमदच्या वकिलाच्या वतीने माफियांचे आजारपण, वय आणि लोकप्रतिनिधी असल्याचा दाखला देत कमी शिक्षेची विनंती करण्यात आली.
दरम्यान, उमेश पाल यांच्या आईने न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्या म्हणाल्या की, हा निकाल आपल्या मुलाच्या अपहरणाच्या प्रकरणावर आला आहे. अद्याप हत्येविषयीच्या प्रकरणाचा वनिर्णय़ येणे बाकी आहे. हत्येप्रकरणी न्यायालय फाशीची शिक्षा सुनावेल, अशी खात्री वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.