आता अमित शहा सांभाळणार बंगालची कमान, भाजपची नवी कोअर कमिटी स्थापन

पश्चिम बंगालमध्ये भाजपने संघटनेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपने 2022 मध्ये स्थापन केलेली 24 सदस्यांची कोअर कमिटी रद्द केली आहे. त्यांच्या जागी 14 सदस्यांची नवी कोअर कमिटी आणि 15 सदस्यांची निवडणूक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचाही नव्या कोअर कमिटीमध्ये समावेश आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा एक दिवसीय भेटीसाठी कोलकाता येथे पोहोचले आहेत. एमजी रोड गुरुद्वारा आणि कालीघाट मंदिराला भेट दिल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी राज्यातील भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीतच जुनी कोअर कमिटी बरखास्त करून त्या जागी नवीन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नव्या निवडणूक समितीच्या सदस्यांमध्ये अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्या नावांचाही समावेश आहे. याशिवाय सुकांता मजुमदार, सुभेन्दू अधिकारी, राहुल सिन्हा, आशा लाक्रा, सतीश धन, मंगल पांडे, अमित मालवीय, लॉकेट चटर्जी, दिलीप घोष, अमित्वा चक्रवर्ती आणि चार सरचिटणीसांना स्थान देण्यात आले आहे.