मुंबई : महाराष्ट्र सरकारने पोलीस भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलीस दलासाठी ही भरती काढण्यात आली असून पोलीस अंमलदार ते सहायक उपनिरीक्षक या पदासाठी ही भरती होत आहे. सर्वप्रथम ३००० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ११ महिन्यांच्या कंत्राटी करारानुसार ही भरती होईल. यासंदर्भात गृह विभागाने शासन निर्णयही जारी केला आहे. सदर शासन निर्णय वित्त विभागाकडील अनौ. संदर्भ क्र.३५६/आपुक, दि.१९/०७/२०२३ अन्वये प्राप्त मान्यतेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आला आहे.
राज्य सरकारने २१ जानेवारी २०२१ रोजी ७,०७६ शिपाई आणि ९९४ वाहनचालकांच्या भरतीला मंजुरी दिली आहे. मात्र, ही भरतीप्रक्रिया आणि या शिपायांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन हे मनुष्यबळ दाखल होण्यास दोन वर्षे लागणार आहेत. तोपर्यंत कंत्राटी पोलिसांची नियुक्ती ११ महिन्यांसाठी केली जाणार आहे. कामाचा वाढता ताण आणि गरज लक्षात घेऊन ही भरती करण्यात येत आहे.
केंद्र सरकारने अग्निपथ योजनेच्या माध्यमातून अग्नीवर नावाने कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला देशभरातून काही ठिकाणी विरोधही झाला. मात्र, सरकारने ही भरती प्रक्रिया सुरू केली असून आता पहिली तुकडी सैन्य दलात दाखलही झाली आहे. त्या पाठोपाठ आता पोलीस भरतीही कंत्राटी पध्दतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.