---Advertisement---
भुसावळ : मध्य रेल्वेच्या मनमाड- जळगाव तिसरी लाइन प्रकल्पांतर्गत मनमाड रेल्वेस्थानकाच्या यार्डचे मोठे आधुनिकीकरण केवळ १३ तासांच्या विक्रमी कालावधीत यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. या कामामुळे रेल्वे वाहतुकीत लक्षणीय सुधारणा होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत एकूण ९ नवीन रूट (रूट क्र. ४५८ ते ४६७) यार्डमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. १२३ विद्यमान रूट्सची पुनर्रचना करण्यात आली आहे. याशिवाय दौंड-मनमाड यार्डदरम्यान नवीन क्रॉस ओव्हरची जोडणी देखील यशस्वीरीत्या करण्यात आली आहे.
या आधुनिकीकरणामुळे मालगाड्यांसाठी थेट वाहतकीची सविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे यार्डमध्ये गाड्यांची गर्दी प्रमाणात कमी होणार आहे. त्याचप्रमाणे प्रवासी गाड्यांच्या संचालनात अधिक लवचिकता मिळणार असून, त्या वेळेवर आणि नियमितपणे धावण्यास मदत होणार आहे.
मध्य रेल्वेने केलेल्या या पायाभूत सुविधांच्या उन्नतीमुळे स्थानिक प्रवाशांसह उद्योग व व्यापार क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे. मनमाड-जळगाव तिसरी लाइन प्रकल्प हा रेल्वेच्या विस्ताराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.