आता लम्पीचीही ‘दुसरी लाट’; लसीकरण करून घेण्याचे आवाहन

तरुण भारत लाईव्ह । २१ मे २०२३। मागील वर्षात राज्यभरात जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला होता. यानंतर सरकारने लसीकरण राबवत लम्पी नियंत्रणात आल्याचा दावा केला होता.  पुन्हा एकदा लम्पीची दुसरी लाट पाहायला मिळत आहे. कारण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा  जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. लातूर जिल्ह्यातील साकोळ आणि राणी अंकुलगा भागात देखील अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत आहे.  आतापर्यंत 13 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

आठ महिन्यापूर्वी लम्पी आजारामुळे जनावरांना अक्षरशः मृत्यूचा सामना करावा लागत होता. त्यामुळे सरकराने देखील गंभीर दखल घेत उपाययोजना केल्या. गावागावात लसीकरण करण्यात आले. मात्र आता पुन्हा एकदा अशीच काही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातील साकोळ आणि राणी अंकुलगा या गावात जनावरांमध्ये लम्पीचं प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर साकोळ पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अंतर्गत 13 पशूंचा मृत्यू झालेला असून, 16 गंभीर आजारी आहेत. त्यामुळे  पशुवैद्यकीय विभागाची चिंता वाढली आहे. दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने या गावात भेटी देखील दिल्या आहेत. पण परिस्थिती नियंत्रणात येतांना दिसत नाही. विशेष म्हणजे या भागातील पशू हे औषध उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचं डॉक्टरांचे म्हणणे आहेत.

सोबतच जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील पशुधनाला लंम्पीच्या आजाराचा विळखा पडला असून  आतापर्यंत 702 पशुधनाला लंम्पीच्या आजाराची बाधा झाली आहे. तर 64 पशुधन दगावले आहेत.  567 जनावरे लंम्पीच्या अजारापासून बरे झालेत. तसेच सद्यस्थितीला 102 सक्रीय रुग्ण असल्याची माहिती आहे.

लम्पीच्या पहिल्या लाटेत लातूर जिल्ह्यात सर्वच भागात लसीकरण करण्यात आले होते. साथ रोग वाढू नये यासाठी काही प्रमाणात निर्बंध ही घालण्यात आले होते.  पुढे जनावरांच्या बाजारांवर बंदी घालण्यात आली होती. लसीकरण करण्यात आल्यावर साथ रोग आटोक्यात आली होती. मात्र मार्च महिन्याच्या नंतर काही ठिकाणी पुन्हा प्रदुर्भाव दिसून येऊ लागला आहे. नवजात वासरे यांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. उपाय योजना सुरू आहेत. ज्या पशूंचे लसीकरण झाले आहे त्यांच्या मृत्येचे प्रमाण दिसून येत नाही. अशा नवजात वासरू मृत्यमुखी पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण मार्च महिन्यापासून जिल्हाभरात आतापर्यंत 1236 नवीन लम्पी बाधित जनावरे आढळून आले आहेत. त्यापैकी 145  रुग्णाचा मृत्यू झाला आहे. बाकी उपचारानंतर ठीक झाले आहेत. यात सर्वात जास्त मृत्यूचे प्रमाण शिरूर अनंतपाळ तालुक्यातील भागात दिसून येत आहे.