मोदींच्या हस्तक्षेपामुळे टळला युक्रेनवरील अणुहल्ला; US रिपोर्टमध्ये धक्कादायक दावा

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्धाबाबत एक मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, २०२२ वर्षाच्या शेवटाला रशिया युक्रेनवर अणुहल्ल्याची तयारी करत होता. हा हल्ला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही देशांच्या नेत्यांनी मध्यस्थी केली होती. मोदींच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला होता. रशिया-युक्रेन युध्दादरम्यान भारताने नेहमीच निरपधार हत्यांच्या विरोधात स्पष्ट भुमिका घेतली होती. भारताच्या या भुमिकेचे जागतिक पातळीवर कौतूक झाले होते.

‘सीएनएन’ने रविवारी एक रिपोर्ट प्रसिध्द केला आहे. ज्यामध्ये दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दावा केलाय की, २०२२ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही देशांच्या नेत्यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करुन युक्रेनमध्ये आण्विक हल्ला रोखण्यासाठी हस्तक्षेप केला. रशियाकडून सामरिक किंवा अणुहल्ला होऊ शकतो. त्यामुळे अमेरिकेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर देशांच्या नेत्यांशी संपर्क केला. त्यामुळे हे भीषण संकट टळलं.

रिपोर्टनुसार, रशियाच्या या निर्णयाची माहिती २०२२च्या शेवटी कळली होती. जेव्हा युक्रेनी सेना दक्षिण रशियाच्या ताब्यात असलेल्या खेरसन भागातून पुढे-पुढे जात होती आणि त्यांनी रशियाच्या सैन्याला घेरलं होतं. अशा स्थितीत अणुहल्ला होऊ शकतो, असा संशय व्यक्त होत होता. त्यानंतर अमेरिकेने भारतासह इतर देशांकडून मदत मागितली. त्यामुळे चीन, भारत आणि इतरांनी रशियाशी संपर्क केला आणि दबाव वाढवला. त्यामुळे रशियाला नमतं घ्यावं लागलं होतं.