न्युक्लिअस बजेट : क्रिकेट संघ, भजनी मंडळं, बचत गटांना मिळणार अर्थसहाय्य

नंदुरबार : केंद्रवर्ती अर्थसंकल्प अर्थात न्युक्लिअस बजेट योजनेत आदिवासी कल्याण व मानव साधन-संपत्ती विकासाच्या क्रिकेट संघ, भजनी मंडळे, बचत गटासारख्या उपक्रमांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे, तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील तळोदा, अक्कलकुवा व धडगांव तालुक्यातील आदिवासी

लाभार्थ्यांनी त्यासाठी २२ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन तळोदा प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी  प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट) योजनेत आदिवासींचे कल्याण व  साधन-संपत्ती विकासाच्या हेतुने अनुसुचित जमातीच्या युवकांना क्रिकेट खेळ खेळण्यासाठी प्रत्येक क्रिकेट  संघासाठी साहित्य संच, अनुसुचित जमातीच्या भजनी मंडळांना धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमासाठी भजन साहित्य, अनुसुचित जमातीच्या बचतगटांचे सक्षमीकरण यासाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

 

त्यासाठी इच्छुक आदिवासी लाभार्थ्यांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विहित नमुन्यातील अर्ज, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा, जि. नंदुरबार ( 0567- 232220 फॅक्स 02567-232220) येथे ११ ते २२ डिसेंबर २०२३ या कालावधीत रविवार आणि शासकीय सुट्टी वगळून इतर दिवशी कार्यालयीन वेळेत वितरीत व स्विकारले जातील, यासाठीचे अर्ज हे कार्यालयातुन घेतलेले, कार्यालयाचा मुळ शिक्का असलेलेच ग्राह्य धरण्यात येतील, झेरॉक्स अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

दिलेल्या मुदतीनंतर (२२ डिसेंबर ) अर्ज वितरीत अथवा स्विकारले जाणार नाहीत. तळोदा, अक्कलकुवा व धडगांव तालुक्यातील पात्र आदिवासी लाभार्थ्यांनी योजनेच्या आवश्यकतेनुसार जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, ग्रामसभेचा ११ ते २२ डिसेंबर २०२३ या कालावधीतील ठराव, रहिवासी दाखला, आधारकार्ड, बँक पासबुक, योजनेच्या अनुसरुन कागदपत्र तसेच यापूर्वी या योजनांतुन लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र छायांकित प्रतीत अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहिल, असेही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोद्याचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.