जळगाव : दुचाकी विशेषत: चार चाकी वाहनांवर विविध रंगांच्या नंबर प्लेट्स तुम्ही पाहिल्या असतील. दुचाकींवर सहसा पांढर्या व हिरव्या रंगाच्या नंबर प्लेट्स असतात. मात्र चारचाकी वाहनांवर पांढरा, पिवळा, लाल, हिरवा, काळा आणि निळा रंगाच्या नंबर प्लेट्स असतात. या प्रत्येक रंगाचा अर्थ वेगळा असतो. याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
पांढर्या रंगाची नंबर प्लेट
आपण वैयक्तीक वापरासाठी ज्या दुचाकी किंवा चारचाकी गाड्या वापरतो. त्यावर पांढर्या रंगाची नंबर प्लेट असते. पांढर्या नंबर प्लेटवर काळ्या अक्षरांनी गाडीचा क्रमांक लिहिला जातो. अशी सर्व वाहने खासगी स्वरुपाची असतात.
हिरव्या रंगाची नंबर प्लेट
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या इलेक्ट्रिक वाहनांवर केवळ हिरव्या रंगाची नंबर प्लेट लावली जाते. ही नंबर प्लेट खासगी आणि व्यावसायिक वाहनांवर लावली जाते. पण या नंबर प्लेटवरील अंक हे त्या त्या वर्गवारीनुसार लावले जातात. म्हणजे जर एखादे इलेक्ट्रीक वाहन हे खासगी असेल, तर त्यावरील अंक हे पांढरे असतात. तर जी कारही व्यावसायिक असेल त्यावरील अंक हे पिवळ्या रंगाचे असतात.
पिवळ्या रंगाची नंबर प्लेट
पिवळ्या रंगाची नंबर प्लेट ही केवळ व्यावसायिक किंवा सार्वजनिक वापरासाठीच्या वाहनांसाठी वापरली जाते. जसे की, रिक्षा, टॅक्सी, कॅब आदी. त्यासोबतच ट्रक, टॅक्टर, ट्रेलर, मिनी ट्रक यासारखे माल वाहतूक करणार्या गाड्यांनाही पिवळ्या रंगाची नंबर प्लेट लावली जाते.
काळ्या रंगाची नंबर प्लेट
काळ्या रंगाची नंबर प्लेट ही केवळ भाड्याने दिलेल्या व्यावसायिक वाहनांवर पाहायला मिळते. अनेक भाड्याच्या कारवर काळ्या रंगाच्या नंबर प्लेट्स असतात. ज्यावर पिवळ्या रंगात क्रमांक लिहिला जातो.
लाल नंबर प्लेट
लाल रंगाची नंबर प्लेट ही फक्त राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या गाड्यांसाठी राखीव ठेवलेली असते. या नंबर प्लेटमध्ये क्रमांकाऐवजी अशोक चक्र असते. याशिवाय लाल रंगाची नंबर प्लेट ही एखाद्या कार निर्माती कंपनी चाचणी किंवा प्रमोशनसाठी रस्त्यावर धावणार्या गाड्यांवरही असते.
निळ्या रंगाची नंबर प्लेट
परदेशी प्रतिनिधींसाठी वापरण्यात येणार्या वाहनांवर निळ्या रंगाची नंबर प्लेट वापरली जातात. या गाडीतून केवळ परदेशी राजदूत प्रवास करु शकतात.