मासिक धर्म अर्थात एमसी पीरियड्सदरम्यान नोकरदार महिला-तरुणींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या चार दिवसांत महिलांना होणारा त्रास लक्षात घेता ओडिशा सरकारने अनोखे पाऊल उचलले आहे.
सरकारी आणि प्रायव्हेट, दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसाची ‘पीरियड्स लिव्ह’ लागू केली आहे. मासिक पाळी दरम्यान महिलांना होणाऱ्या शारीरिक मानसिक आव्हानांना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री परिदा यांनी म्हटले आहे.
सरकारचे हे धोरण महिलांच्या आरोग्य आणि कल्याणाला प्राधान्य देण्यासाठी आहे. महिला कर्मचारी आपल्या पीरियड्सच्या एक दिवस आधी किंवा दुसऱ्या दिवशी त्यांच्या आवश्यकतेनूसार एक दिवसांची सुटी घेऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अंमलबजावणी कधी ?
या धोरणाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे परिदा यांनी सांगितले. ओडिशा हे राज्य मासिक धर्म समानता Menstrual Equity च्या क्षेत्रात देशाचे नेतृत्व करणारे ठरणार आहे.
या मोहीमेचा उद्देश्य महिलासाठी एक कलेक्टीव आणि कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण करण्याचा आहे. महिला आत्मसन्मानाच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार असून सरकारचा हा निर्णय जगाला देखील प्रेरणा देणारा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.