तरुण भारत लाईव्ह । भुवनेश्वर : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बाहानगा येथे २ जून रोजी झालेल्या भीषण रेल्वे अपघाताबाबत एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. ज्यामध्ये सिग्नल यंत्रणेत गडबड झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे इंटरलॉकिंग यंत्रणा बिघडली होती. दरम्यान सीबीआयला मोठी माहिती मिळाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कोरोमंडल एक्सप्रेसच्या अपघाताआधी सिग्नलमधील बिघाड आढळून आला होता. ती माहिती बाहानगा बाजार स्थानकाच्या सहाय्यक स्टेशन मास्तरांना (एएसएम) यांना होती. त्यानंतर एएसएमने तंत्रज्ञांना बोलावले, मात्र त्यांना येण्यास उशीर होत असल्याने त्यांना फोन करून रेल्वेच्या संचालनासाठी सिग्नल यंत्रणा सुरळीत करण्यास सांगितले.
त्यानंतर २ जून रोजी सकाळी तंत्रज्ञांनी सिग्नल यंत्रणा सुरळीत केली.मात्र एएसएमने सिग्नल यंत्रणा योग्यरित्या काम करत आहे की नाही हे तपासले नाही. आणि त्यांचाच परिणाम म्हणून अपघात झाला. त्यामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने एवढ्या मोठ्या रेल्वे अपघाताचे प्रकरण पुरावे म्हणून सीबीआयकडे आले आहे. या त्रुटीमुळे कोरोमंडल मुख्य मार्गाऐवजी लूप लाइनकडे वळवण्यात आले. ज्यावर मालगाडी आधीच उभी होती.दरम्यान या प्रकरणी सीबीआय स्टेशन मास्तर, एक तंत्रज्ञ आणि इतर काही कर्मचाऱ्यांची गुप्त ठिकाणी चौकशी करत आहेत.