दोन लाखांची लाच भोवली ः धुळे एसीबीच्या कारवाईने खळबळ

धुळे : शासकीय विद्युत ठेकेदाराने केलेल्या कामाचे बिल काढून देण्यासाठी तडजोडीअंती दोन लाखांची लाच स्वीकारणार्‍या धुळ्यातील वीज वितरण कंपनीच्या वित्त व लेखा व्यवस्थापकासह उपव्यवस्थापकास धुळे एसीबीच्या पथकाने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली. बुधवारी सायंकाळी धुळे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात हा सापळा यशस्वी करण्यात आला. वित्त व लेखा व्यवस्थापक अमर अशोक खोंडे (41) व उपव्यवस्थापक मनोज अर्जुन पगार (46) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

कार्यालयातच स्वीकारली लाच
तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असून त्यांनी धुळे व दोंडाईचा विभागासह धुळे ग्रामीणमध्ये डीपीडीसी अंतर्गत मंजूर निधीतून 2018-2019 मध्ये काम केले होते. या कामाचे बिल 56 लाख 31 हजार 590 रुपये काढून देण्याच्या मोबदल्यात दोघा आरोपींनी पाच लाखांची लाच मागितली होती मात्र अडीच लाखात तडजोड झाल्यानंतर त्यात पहिला हप्ता दोन लाख रुपये बुधवारी मागितल्याने एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. धुळ्यातील कार्यालयात आरोपींनी लाच स्वीकारताच दोघांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या नेतृत्वात निरीक्षक प्रकाश झोडगे, शरद काटके, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संतोष पावरा, गायत्री पाटील, रामदास बारेला, वनश्री बोरसे, रोहिणी पवार, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.