धुळे : एआयएमआयएमचे आमदार फारूक अन्वर शाह यांनी धुळ्यातील एका चौकात कोणतीही परवानगी न घेता अनाधिकृतपणे टीपू सुल्तानचे स्मारक उभारले होते. भाजपाच्या युवा मोर्चाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याची माहिती दिली होती. याचबरोबर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक, धुळे पालिकेलाही पत्र लिहून हे स्मारक हटविण्याची मागणी करण्यात आली होती.
तक्रार प्राप्त झाल्यावर अधिकार्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार टीपू सुल्तानच्या अनधिकृत स्मारकावर बुलडोझर चालविण्यात आला आहे. प्रशासनाने आमदार शाह यांच्यासोबत चर्चा करून हे प्रकरण मिटविले आहे. नगर पालिकेने हे स्मारक पाडले आहे. या पार्श्वभूमीवर धुळ्यात सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी औरंगजेब आणि टीपू सुल्तानचे स्टेटस ठेवल्याने कोल्हापुरात वातावरण तापलेले होते. यावर फडणवीस यांनी अशा प्रवृत्तींना खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला होता. धुळ्यातील १०० फुटी रोडवर या स्मारकाचे बांधकाम करण्यात आले होते. ते पाडण्यात आल्याबद्दल भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी फडणवीस यांचे आभार मानले आहेत.