अरे देवा! शिरपूरातील लाचखोर अधिकार्‍याने घरातच स्वीकारली लाच

धुळे :  लाचखोरांवर नेहमीच कारवाई होत असलीतरी लाचखोरांमध्ये सुधारणा होत नाही. शिरपूर तालुक्यातील मंडळाधिकार्‍याने चक्क राहत्या घरातच लाच देण्यासाठी तक्रारदाराला बोलावले मात्र पथकाने लाच स्वीकारताच त्यास अटक केली. अशोक चिंधू गुजर असे अटकेतील संशयिताचे नाव असून ते वाघाडीचे मंडहाधिकारी आहेत. मंगळवारी दुपारी शिरपूर येथील आरोपीच्या राहत्या घरात हा सापळा यशस्वी करण्यात आला. या सापळ्याने शिरपूर तालुक्यातील महसूल विभागातील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

राहत्या घरात स्वीकारली लाच
वकवाड, ता.शिरपूर येथील तक्रारदाराची वडिलोपार्जित शेतजमीन असून त्या जमिनीवर चुकून विहिर नसतानाही तशी नोंद झाल्याने त्यांना शासकीय अनुदान मंजुरीसाठी अर्ज करता येत नव्हते. वाघाडी मंडळाधिकारी अशोक गुजर यांची भेट घेतल्यानंतर शेतजमिनी संदर्भात यापूर्वी केलेल्या हक्कसोड कामाचे बक्षीस म्हणून तसेच सातबारा उतार्‍यावरील विहिरीची नोंद कमी करण्याच्या मोबदल्यात 15 हजारांची लाच मागितल्यानंतर दहा हजारात तडजोड झाली व या संदर्भात सोमवार, 8 मे रोजी तक्रारदाराने दूरध्वनीवरून तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. मंगळवारी दुपारी मंडळाधिकारी गुजर यांनी शिरपूर येथील मिलिंद नगरातील राहत्या घरी तक्रारदाराला लाच रक्कम देण्यासाठी बोलावल्यानंतर लाच स्वीकारताच आरोपीला अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण, राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, भूषण खलाणेकर, गायत्री पाटील, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, रोहिणी पवार, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी यशस्वी केला.