---Advertisement---
जळगाव : पोलिस असल्याची बतावणी करून पायी जाणाऱ्या चुन्नीलाल दौलत पाटील (६८, रा. पिंप्राळा) यांच्या बोटातील सोन्याच्या दोन अंगठ्या दोन जणांनी हातचलाखीने लांबविल्या. ही घटना १५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पिंप्राळा परिसरातील भवानी माता मंदिराजवळ घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त चुन्नीलाल पाटील हे १५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भवानीमाता मंदिराजवळ पायी फिरत होते. या वेळी त्यांच्याजवळ दोन दुचाकीस्वार तरुण तोंडाला रुमाल बांधून आले. त्यांनी वृद्धास ‘तुम्ही या रोडवर एकटे का फिरत आहेत, या ठिकाणी काल एका जणाचे अपहरण करून त्याच्याजवळील तीन लाख रुपये घेऊन गेले आहे. आम्ही पोलिस डिपार्टमेंटमध्ये आहोत, म्हणून तुम्हाला सावध करत आहेत, असे सांगितले.
दुचाकीस्वाराने रुमाल झटकताच वृद्धाने स्वतः काढून दिल्या अंगठ्या
दुचाकीवरील एकाने त्याच्याजवळील रुमाल काढून वृद्धाच्या चेहऱ्यासमोर झटकला. या वेळी त्यांना काहीही समजत नव्हते. वृद्धाला खिशातून रुमाल काढण्यास सांगून त्यामध्ये बोटातील अंगठ्या ठेवा, असे सांगितल्यानंतर वृद्धाने बोटातील ६० हजार रुपये किमतीच्या १० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या काढून रुमालात ठेवल्या. तो रुमाल घेऊन दुचाकीस्वार तेथून पसार झाले. दहा मिनिटांनंतर वृद्धास बरे वाटू लागले व त्यांनी घरी जाऊन घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. पुढील तपास पोउनि सचिन रणशेवरे करीत आहेत.