जुनी पेन्शन योजना : मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले आम्ही..

मुंबई : राज्यातील शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी निमशासकीय व शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारले आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळात मोठी माहिती दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?
येत्या काळात जुन्या पेन्शन धारकांच्या प्रश्नांवर विचार केला जाणार आहे. जुन्या पेन्शनबाबत तीन महिन्यात समिती अहवाल देणार असून आता कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, आम्ही सकारात्मक आहोत, याबरोबरच आम्ही निर्णय घेण्याची तयारी केली आहे. फक्त कर्मचाऱ्यांनी संयम ठेवावा. त्यांची भूमिका आम्हाला समजावून घ्यायची आहे. हा जो प्रश्न आहे तो चर्चेनं सुटेल हे लक्षात घ्यावे. असेही आवाहन त्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, आमची भूमिका ही मदतीची राहणार आहे. आमची पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे. त्यात आम्ही कर्मचाऱ्यांचे प्रश्न समजावून घेतले आहे. आमची भूमिका सकारात्मक आहे. आपण जे काही निर्णय घेणार आहोत त्याचे आर्थिक परिणाम यासगळ्याचा सारासार विचार होण्याची आवश्यकता आहे. तेव्हा सगळ्या बाजूनं विचार होईल. त्यामुळेच आपण एक समिती तयार करण्याचा विचार केला आहे.

सरकारनं चर्चा करुन निर्णय घेण्याचा विचार केला आहे. त्यातून मार्ग निघेल असा आमचा विश्वास आहे. या निर्णयातून जे सुत्र ठरेल ते उपयोगी ठरेल. तातडीनं कुठलाही कर्मचारी निवृत्त होत नाही. निर्णय येईपर्यत जे निवृत्त होतील त्यांना देखील आगामी काळात नव्या निर्णयाचा फायदा होणार आहे. त्यांना योग्य ते लाभ घेता येतील. आम्ही सकारात्मक आहोत. असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.